अडावद, ता.चोपडा : मदरसा बांधकाम करण्याच्या विषयावरून वाद चिघळल्याने दोन गटात तुफान हाणामारीसह झालेल्या दगड फेकीत १४ जण जखमी झाल्याची घटना येथे २१ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोन्ही गटांच्या परस्पर विरोधी फिर्यादीवरुन अट्रासिटीसह दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील तकीया मोहल्ला मशिदीलगत असलेल्या मोकळ्या जागेत मदरसा बांधकामासाठी नियोजन सुरु होते. परंतु, यामुळे तडवी समाजाचा सामूहिक वापराचा रस्ता अडचणीचा ठरेल. यावरून मुस्लिम समुदाय व तडवी समाजात अंतर्गत धुसपूस सुरु होती. या विषयाने २१ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास उग्ररुप धारण केले. दोन्ही गटातील मोठा समुदाय आमनेसामने आल्याने वाद विकोपाला गेला. दोन्ही गटात तुफान हाणामारीसह दगफफेक झाल्याने १४ जण जखमी झाले. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण होवून छोट्या मोठ्या व्यावसायीकांनी आपापली दुकाने पटापट बंद करुन घेतली होती.
पोलीसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला
वाद होत असल्याची माहिती मिळताच अडावद पोलीस स्टेशनचे नवनियुक्त सपोनि प्रमोद वाघ, स.फौ. शरिफ तडवी, भरत नाईक, ज्ञानेश्वर सपकाळे, सतिष भोई, शेषराव तोरे, फिरोज तडवी, संजय धनगर, अनवर तडवी, नासिर तडवी, भुषण चव्हाण, रमिज शेख हे घटनास्थळी दाखल झाले. सपोनि वाघ यांनी दोन्ही गटांना शांततेचे आवाहन करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. क्षणार्धात निर्माण झालेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे पोलीसांची पुरती दमछाक झाली. परंतु घटनेची स्थिती पाहता पोलिसांच्या समय सूचकतेमुळे कमी पोलीस कुमक असूनही पोलीसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
या प्रकरणी तनुजा लाला तडवी यांच्या फिर्यादीवरुन एका गटावर अट्रासीटीसह दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास चोपड्याचे उपविभागिय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे हे करित आहेत. या गुन्ह्यात पोलीसांनी आतापर्यंत ४ जणांना अटक केली असून या चौघांना १ दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. तर मोहसिन खान जबिउल्ला खान यांच्या फिर्यादीवरुन दुसऱ्या गटावर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास सपोनि प्रमोद वाघ हे करित आहेत. यात आतापर्यत ६ जणांना अटक करण्यात आली असून त्यांना २ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. याघटनेतील बरेचसे संशयीत फरार असून त्यांच्या शोधार्थ पोलीसांची शोध पथके रवाना झाली आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. रामेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, चोपड्याचे उपविभागिय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, ग्रामिणचे पोलिस निरिक्षक कावेरी कमलाकर, एलसिबीचे पोलीस निरिक्षक बबन आव्हाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलीसांचा मोठा फौजफाटा तैनात केल्याने अडावदला छावणीचे स्वरुप आले होते.