भुसावळ : चिमुकल्याला अपहरण केल्याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. यातील एक नंदूरबार जिल्हा पोलीस दलात पोलीस हवलदार म्हणून कार्यरत असल्याचे समोर आले आहे.
भुसावळ तालुक्यातील साकेगावात अरविंद्र अर्जून भिल हा आठ महिन्याच्या चिमुकला मंगळवारी २३ एप्रिल रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास घरातील झोक्यात झोपलेला असताना त्याला झोक्यातून उचलून अपहरण केल्याची घटना घडली होती. या याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी संबंधित विभागाला कारवाईच्या सुचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील आणि भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन जगताप यांनी पथक रवाना केले. पथकाने गोपनिय माहितीच्या आधारे भुसावळ शहरातील नारायण नगर मोरया हॉटेलच्या समोर असलेले अलका जीवन स्पर्श फाऊंडेशन या ट्रस्टवर छापा टाकला. त्यात अपहरण झालेले आठ महिन्याचे बालक मिळून आला.
या गुन्ह्यात पोलीसांनी दिपक रमेश परदेशी वय ३२ रा. नारायण नगर, भुसावळ, अमीत नारायण परिहार वय ३० रा. नागसेन कॉलनी, कंडारी ता. भुसावळ, कुणाल बाळू वाघ वय १९ रा. साकेगाव ता. भुसावळ, बाळू पांडूरंग इंगळे वय ५१ रा. वरणगाव ता. भुसावळ आणि रिना राजेंद्र कदम वय ४८ रा. नारायण नगर, भुसावळ या पाच जणांना अटक करण्यात आले आहे. शिवाय या गुन्ह्यातील एक आरोपी आणि दोन विधीसंघर्षीत बालकाचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर अटकेतील बाळू इंगळे हा नंदूरबार जिल्हा पोलीस दलात पोलीस हवलदार म्हणून कार्यरत असल्याचे समोर आले आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस अधिक्षक डॉ महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, विभागीय पोलीस अधिकारी कृष्णकांत पिंगळे, पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, पो.नि. बबन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विशाल पाटील, सहाय्यक फौजदार विठ्ठल फूसे, पोहेकॉ युनूस शेख, प्रेमचंद सपकाळे, वाल्मिक सोनवणे, दिलीप जाधव, संजय भोई, संजय तायडे, पो.ना. नितीन चौधरी, जगदीश भोई, राहूल महाजन, सहाय्यक फौजदार सादीक शेख, पोहेकॉ उमाकांत पाटील, रमन सुरळकर, योगेश माळी, प्रशांत परदेशी, योगेश माळी, अमर आढाळे, राहूल भोई, पोलीस उपनिरीक्षक वाघमारे यांनी कारवाई केली आहे.