जालना : मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेलेल्या मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. गेल्या आठ दिवसांपासून मनोज जरांगे यांच्या पोटात अन्नाचा कणही गेलेला नाही. यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. काल राज्य शासनाचे शिष्टमंडळ येऊन जरांगे यांच्याशी सकारात्मक चर्चा करून गेले. तरी मनोज जरांगे हे आरक्षणाचा GR आल्याशिवाय उपोषण सोडणार नाही या भूमिकेवर ठाम आहेत. आज ९ व्या दिवशी मात्र मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली असून डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून त्यांना सलाईन लावली आहे.
आरक्षणप्रश्नी सुरू असलेल्या उपोषणस्थळी मंगळवारी मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री अतुल सावे, मंत्री संदीपान भुमरे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, आमदार राजेश टोपे, आमदार नारायण कुचे, सतीश घाटगे यांनी भेट देऊन चर्चा केली. ‘सरकारला तीस दिवसांची मुदत द्या, तांत्रिक अडचणी आहेत, समिती कदाचित दहा-पंधरा दिवसांत काम करील, तुम्हीही मुंबईत येऊन समितीबरोबर मदत करा,’ असे महाजन यांनी सरकारतर्फे सांगितले. मात्र, मुंबईत येण्यास जरांगे यांनी नकार दिला.
जरांगे पाटील म्हणाले, ‘विदर्भाला कुणबी मराठ्यांना आरक्षण मिळते, मग तुम्ही मराठवाड्यासाठीदेखील ते द्यायला हवे. आरक्षण देणे सरकारच्या हातात आहे. तुमचे ऐकून खूप वेळा आंदोलन मागे घेतले. आता आरक्षणाशिवाय उठणारच नाही. मला कोणालाच नाराज करायचे नाही. मी इथे शांततेत बसून राहतो. कोणालाही काही बोलत नाही. विनाकारण मी ताणून धरीत नाही. आरक्षण दिल्याचा मुख्यमंत्री आणि सचिवांची सही असलेला अध्यादेश द्या, आणखी चार दिवसांची मुदत त्यासाठी घ्या. तेव्हा तुमचे स्वागतच करेन आणि उपोषण सोडेन. ’