मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईच्या वेशीवर येऊन धडकले असून ते नवी मुंबईत दाखल झाले आहे. वाशीमध्ये मनोज जरांगे यांची भव्य सभेनंतर ते मुंबईकडे रवाना होणार आहेत. जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातील मराठा बांधव नवी मुंबई दाखल झाल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी देखील होत आहे.
त्याआधी राज्य सरकारकडून तोडगा काढण्यासाठी दोन जणांचं शिष्टमंडळ पाठवण्यात आले. मनोज जरांगे आणि शिष्टमंडळामध्ये चर्चा झाली आहे. थोड्याच वेळात मनोज जरांगे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्याआधीच राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं महत्वाचं विधान समोर आले आहे.
न्यायालयाने सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी,असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तर मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा असल्याचं अजित पवार यांनी सांगितलेय.तसेच राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त केलेल्या भाषणात मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट केली.
मराठा आरक्षणाबाबत न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. तसेच राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात मे 2023 मध्ये क्यूरेटिव पिटीशन दाखल केली. शासनाची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञांचा टास्क फोर्स स्थापन करण्यात आली असे रमेश बैस म्हणाले.