मनोरुग्ण चढला रेल्वेच्या ‘हायटेन्शन’ वीजवाहिनीवर; नंदुरबार रेल्वेस्थानकावर थरार

नंदुरबार : रेल्वेस्थानकावर एक तरुण रेल्वेला पुरवठा करणाऱ्या उच्च दाबाच्या वाहिनीवर चढल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी घडला. वाहिनीवर चढणारा युवक हा मनोरुग्ण असून, त्यांच्या या कृत्यानंतर रेल्वेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने अनर्थ टळला. सुमारे तासभर वीज प्रवाह बंद असल्याने रेल्वेगाड्यांचे वेळापत्रकही कोलमडले होते.

मंगळवारी सकाळी रेल्वेस्थानकात पश्चिम रेल्वे मार्गावर उधना जळगावदरम्यान धावणाऱ्या गाड्यांची वाहतूक सुरळीत सुरू असताना, स्थानकाच्या मधोमध असलेल्या रेल्वे पोलवरून एक युवक वाहिनीवर चढल्याचे दिसून आले होते. हा प्रकार दिसन आल्यानंतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तसेच रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली, अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वीजपुरवठा खंडित करण्यात आला. युवक खाली पडण्याचा धोका असल्याने भुसावळकडून सुरतकडे येणारी मेमू गाडीही स्थानकाबाहेर थांबवण्यात आली.

याठिकाणी दुरुस्ती करणारे रेल्वे इंजिन बोलावण्यात येऊन युवकाची समजूत काढत रेल्वे अधिकारी आणि सुरक्षा बलाचे अधिकारी यांनी संबंधितास खाली उतरवले. यामुळे रेल्वेस्थानकात असलेल्यांचे चांगलेच मनोरंजन झाले. युवकाला ताब्यात घेण्यात आल्यानंतर तो मनोरुग्ण असल्याची माहिती देण्यात आली. त्याची ओळख पटवून कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्याचे काम रेल्वे पोलिस करत आहेत.