मन सुन्न करणारी घटना; आईच्या डोळ्यांदेखत पोटच्या पोराचा करुण अंत

तरुण भारत लाईव्ह । १३ ऑक्टोबर २०२३। नाशिक मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उड्डाणपुलावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात पाठीमागून आलेल्या आयशर ट्रकने धडक दिल्याने दुभाजकावर पडून  १० वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हि दुर्घटना गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास सिन्नर फाटा येथे घडली.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार,वरद गणेश चिखले असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या शालेय विद्यार्थ्याचे नाव असून तो जेलरोड येथील के. एन. केला शाळेत पाचवीत शिक्षण घेत होता. त्याचा गुरुवारी पेपर होता. पेपर झाल्यावर त्याची आई संगीता चिखले या त्याला शाळेतून घरी घेऊन येत होत्या. उड्डाणपुलावरील सिन्नर फाटा बाजूकडील उतारावर त्यांच्या दुचाकीला पाठीमागून आयशर ट्रकने धडक दिली. त्यामुळे संगीता चिखले या दुचाकीसह दुभाजकावर पडल्या. वरदच्या पायांसह डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला स्थानिक नागरिकांनी त्वरित सिन्नर फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

वरद हा शहर पोलिस दलातील कर्मचारी गणेश चिखले यांचा लहान मुलगा होता. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांकडून पालिकेच्या या असंवेदनशील कारभारावर प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. पोलिस नाईक अनिल पवार यांनी या अपघातप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आयशर ट्रक (एमएच १४ एलबी ०७२६) चालक अहमद पटेल  याला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.