मन सुन्न करणारी घटना; वडीलांसह दोन मुलांचा तापी नदीत बुडून मृत्यू

तरुण भारत लाईव्ह । १० सप्टेंबर २०२३। धुळ्यातून एक मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. तापी नदीवर गेलेल्या वडील व दोन मुलांचा पाण्यात उतरले असताना  दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दुसऱ्या दिवशी त्यांचे मृतदेह तरंगताना आढळून आले.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, सेंधवा मध्य प्रदेश येथील मूळचे रहिवाशी असलेले कुटुंब नेवाडे शिंदखेडा येथे मजुरीसाठी आले होते. आदिवासी कुटुंब चार- पाच वर्षांपासून येथेच वास्तव्यास होते. दरम्यान शुक्रवारी ८ सप्टेंबर दुपारी शेतातील झोपडीतून नदीकाठी हरसिंग भीमसिंग देवरे (वय ३५), त्यांचा मुलगा आकाश (वय ८) व मुलगी नवसी (वय १०, सर्व रा. झोपाली, ता. सेंधवा, जि. बडवानी, मध्य प्रदेश) नदीकाठी गेले असता त्यांचा बुडून मृत्यू झाला.

शनिवारी (ता.९) ते तिघे नेवाडे येथील काठावर मिळून आले. त्यांना शिंदखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉ. कुंदन वाघ यांनी त्याना मृत घोषित केले. शिंदखेडा पोलिसांत अकस्मात मृत्यू्ची नोंद झाली. तिघे तापी नदीपात्राच्या किनाऱ्याला बेशुद्धावस्थेत मिळून आले.