मराठा आंदोलनात फुट ? जरांगेंच्या सहकाऱ्याचा धक्कादायक खुलासा, वाचा सविस्तर

मराठा आरक्षण विधेयक मंगळवारी विधानसभेत एकमताने मंजूर झाले असून ते आता विधान परिषदेत मांडले जाणार आहे. राज्यातील मराठा समाजाच्या लोकांना सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण देण्याची तरतूद आहे.

दरम्यान, मनोज जरंगे पाटील यांनी मंगळवारी विधानसभेने मंजूर केलेल्या आरक्षण विधेयकाचे स्वागत केले, मात्र जे आरक्षण प्रस्तावित केले आहे ते आमच्या समाजाच्या मागणीनुसार नाही, असा युक्तिवाद केला.

ते म्हणाले की, मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची आमची मागणी आहे. 10 टक्के मराठा आरक्षणावर जरंगे समाधानी नाहीत. सरकारने फसवणूक केली असून आता आंदोलन तीव्र करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, जरांगेंच्या  आंदोलनातील महत्वाचे सदस्य अजय महाराज बारसकर यांनी पत्रकार परिषदेत धक्कादायक खुलासा केला आहे. यामुळे मराठा आंदोलनात फुट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.

अजय महाराज बारसकर यांनी काय म्हटलंय ?
मनोज जरांगे यांनी दररोज आपली वक्तव्ये बदलली. ते नेहमी खोटं बोलतात. जरांगे कॅमऱ्यासमोर बोलतात ते पारदर्शक आहेत, असं समजून जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. मात्र त्यांनी २३ डिसेंबर रोजी पहिल्यांदा कन्हया हॉटेलमध्ये पहिली गुप्त भेट घेतली, असा धक्कादायक खुलासा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणातील लढाईमधील महत्वाचे सदस्य अजय महाराज बारसकर यांनी केला आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणातील लढाईमधीलमधील महत्वाच्या सदस्यांनी आज माध्यमांशी मुंबईमध्ये संवाद साधला. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणच्या आंदोलनात मराठा समाजाला कशा प्रकारे वेठीस धरून आपली स्वार्थ भूमिका मांडत आहेत यासंदर्भात मोठा खुलासा आणि अनेक आरोप या पत्रकार परिषदेत करण्यात आलेत.

25 तारखेला सगळ्यांच्या साक्षीने मुंबईला निघायचं होतं. त्यावेळी अचानक २० जानेवारीला मुंबईला निघायचं अशी घोषणा जरांगे पाटलांनी सभेवेळी केली. त्यांनी आम्हाला कोणतीही माहिती न देता ही घोषणा केली होती. जरांगेंची रांजणगाव गणपती येथे एका बंगल्यावर पहाटे ४ ते सकाळी ६ या वेळेत एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याशी बैठक झाली होती, असा गौप्यस्फोट अजय महाराज बारसकर यांनी केला आहे.

लोणावळा आणि वाशीमध्ये सुद्धा जरांगे पाटलांनी गुप्त बैठक घेतल्यात. त्यामुळे जरांगे पाटील पारदर्शक व्यक्ती नाहीत हे समाजाने लक्षात ठेवावे. वाशी मार्केटमध्ये देखील सभा झाली होती. जरांगे गुप्त बैठका करत आहेत हे माझ्या लक्षात आलं होतं. मात्र एक आंदोलक आणि समाजाचा एक भाग म्हणून मी त्यांच्यासोबत होतो, असंही बारसकर यांनी म्हटलं.

वाशीच्या मार्केटमध्ये जरांगे पाटील भाषणाला उठले आणि म्हणाले आपण सर्वांनी आझाद मैदानात आंदोलन करायचं. आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटायचं नाही. त्यानंतर जरांगे भाषणात पुन्हा म्हणाले की, सरकारने आपल्याला लवकर जीआर दिला पाहिजे. इतकावेळ वाट पाहायला लावूनये.

त्यावेळी सरकरच्या वतीने सेक्रेटरी भांगे तेथे उपस्थित होते. त्यांनी लगेचच सांगितलं की १५ मिनिटांत जीआर, अध्यादेश देतो. त्यानंतर जरांगे पाटील म्हणाले की, १५ मिनिटांत जीआर मिळणार आहे. असं नाटक जरांगेंनी केलं, असा किस्सा यावेळी बारसकर यांनी सांगितला तसेच ते पुढे म्हणाले की, जरांगेंना कायदा समज नाही, त्यांना कायद्याचं काहीच ज्ञान नाही. दरम्यान, आता या पत्रकार परिषदेनंतर मराठा आंदोलनात फुट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.