नागपूर : मराठा आरक्षणाचा इतिहास काढून बघितला तर सर्वात मोठा विरोध शरद पवार यांनीच केला आहे. त्यांना वारंवार संधी मिळाली. मनात आणले असते तर मंडल आयोग लागू झाला तेव्हाच शरद पवार यांनी मराठा आरक्षण दिले असते, पण त्यांनी दिले नाही. शरद पवार यांना केवळ विविध समाजांना झुंजवत ठेवण्यातच जास्त रस आहे. लोक झुंजत राहिले तर नेतेपद राहील, ही त्यांची राजकारणाची पद्धत असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
नागपूर येथे आयोजित भाजप प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री फडणवीस हे बोलत होते. ते पुढे बोलताना म्हणाले की, महाविकास आघाडीची सत्ता असताना सुप्रिया सुळे म्हणायच्या की, राज्यात मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का?
भाजपचे सरकार असताना मराठा समाजाला आरक्षण मिळाले. आपले पण सरकार गेल्यानंतर मराठा आरक्षणावर स्थगिती आली. मराठा समाजाला आरक्षण भाजप सर्वतोपरी प्रयल करेल, पण कुठल्याही परिस्थितीत ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही. हे भाजपचे वचन आहे. आपण निवडणुकीच्या निकालाचा विचार करून कोणत्याही समाजाबाबत निर्णय घेत नाही.
काँग्रेस नेते राहुल गांधी हे ईश्वराने आपल्याला दिलेले वरदान आहे. विरोधी पक्षाचा प्रमुख असावा तर असा. काँग्रेसने केवळ स्वतःचा विचार केला. नेते मोठे झाले पक्ष लहान झाला, अशी टीका त्यांनी केली.