मराठा आरक्षण! अखेर मनोज जरांगेच्या सर्व मागण्या मान्य, सरकारकडून राजपत्र प्रकाशित

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाच्या लढ्याला मोठ यश मिळालं आहे. मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या असून याबाबतचा अध्यादेश निघाला आहे. हा अध्यादेश आजपासूनच लागू होणार असल्याची माहिती जरांगे यांनी दिली आहे. रात्री उशिरा सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली आणि त्यानंतर हा निर्णय झाला आहे.

खरंतर कुणबी प्रमाणपत्र असलेल्या मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्याव ही मनोज जरांगे पाटील यांची मुख्य मागणी होती. ती मान्य केली होती. पण सगेसोयरे शब्दाचा समावेश होत नसल्यामुळे लाखो मराठे आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहत होते. आता या शब्दाचा समावेश झाला आहे. याबाबतचा अध्यादेश राज्य सरकारने जारी केला असून मराठा आरक्षण आंदोलनाचा हा मोठा विजय असून आज नवी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठ्यांची भव्य सभा होत आहे. या सभेला मनोज जरांगे पाटील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाकडून गिरीश महाजन उपस्थित आहेत.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील यांनी ज्यूस पिऊन उपोषण सोडलं. मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाचा मनोज जरांगे पाटील यांचा प्रदीर्घ लढा संपला.

मुख्यमंत्र्यांचा विरोध संपला…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले आहे. आपला त्यांना विरोध संपला आहे. आपली मागणी मान्य झाली आहे. आपल्याला विरोध करणाऱ्यांना आपण विरोध होता. समाज म्हणून आपला विषय संपला आहे. समाजाला मी मायबाप मानले आहे. मी तुम्हाला विचारून निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांना बोलवू का? यावर सर्वांनी होकार दिल्याने मी निर्णय घेतला आहे. सर्व खुट्या मी उपटल्या आहेत. मला विजयी सभा प्रचंड मोठी घ्यायची आहे. ती तारीख लवकर घोषित करणार, असल्याचे जरांगे म्हणाले.