मुंबई : मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात घेतलेल्या भुमिकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जम्मू आणि काश्मीर राज्यातील कुपवाडा जिल्ह्यातील भारत पाकिस्तान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ ४१ राष्ट्रीय रायफल्स, मराठा बटालियन येथे देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली आहे.
भुजबळांच्या भूमिकेवर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “महाराजांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या ऊर्जा, प्रेरणामुळे महाराष्ट्राची सर्व संकट दूर होतील. मी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार त्या मिटींगमध्ये होतो, जेव्हा ओबीसी समाजाचे नेते आले होते.
त्यांना आम्ही स्पष्ट सांगितलं होतं. आम्हाला विचारलं होत त्यावेळेस ओबीसी समाजाला धक्का न लावता ओबीसी समाज किंवा अन्य कुठल्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण दिलं जाईल, अशा प्रकारची भुमिका राज्य सरकारची आहे. त्यामुळे यामध्ये कुणीही समाजांमध्ये ओबीसींमध्ये संभ्रम पसरवण्याची आवश्यकता नाही. सरकारची भुमिका स्पष्ट आहे.” असं शिंदे म्हणाले.