मराठा आरक्षण! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

उद्धव ठाकरे मराठा समाजाचे मारेकरी आहेत. मराठा आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार ठाकरेंना नाही. मराठा मोर्चाला मुका मोर्चा बोलणारे कोण होते? उद्धव ठाकरेंच्या पायाखालची वाळू सरकली आहे. असा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला आहे. उबाठा प्रमुख उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सरकारच्या भुमिकेवर टीका केली होती. यावर मुख्यमंत्री शिंदेंनी प्रत्त्युत्तर दिले आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, “आयोगाला इम्परिकल डेटा गोळा करण्याचं काम युद्धपातळीवर सुरु केलं आहे. मराठा समाजाला आम्ही आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहोत. जेव्हा मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं. उच्च न्यायालयामध्ये त्या आरक्षणाला चॅलेंज देण्यात आलं, तिथेही ते आरक्षण टिकलं. ते टिकवण्याचं काम मी आणि देवेंद्र फडणवीसांनी केलं. पण दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालायमध्ये ते टिकलं नाही. त्यामुळे मराठा समाजाचे खरे मारेकरी तुम्ही आहात. तुम्हाला यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही.”
“मराठा समाजाच्या महिलांच्या मुक मोर्चाला मुका मोर्चा म्हणून हिणवणारे महिलांचा अपमान करणारे कोण होते? हे सकळ मराठा समाजाला माहिती आहे. म्हणून जे मराठा समाजाचं आरक्षण घालवायला जबाबदार तुम्ही आहात, ते आम्ही आता मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी आम्ही क्युरेटिव्ह पेटिशन दाखल केली आहे.” असा पलटवार शिंदेंनी केला आहे.