मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाल आहे. आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे आमरण उपोषणावर ठाम असून शांततेत विषय हाताळण्याचे आवाहन करत आहेत. तर दुसरीकडे संतप्त आंदोलकांनी आपला राग लालपरीवर काढला आहे. आक्रमक जमावाने गेल्या 4 दिवसात 85 पेक्षा जास्त एसटी बसेसची मोडतोड केली तर 4 एसटी बसेस ची जाळपोळ केली आहे. यामुळे गेल्या 4 दिवसात एसटी महामंडळाचे 4 कोटींचे नुकसान झाले आहे.
गेल्या 3 ते 4 दिवसापासून मराठवाड्यातील परभणी, धाराशीव, लातूर, जालना, नांदेड या जिल्ह्यातील सर्व एसटी वाहतूक बंद आहे. तसेच बीड, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर जिल्ह्यातील एसटी वाहतूक अंशतः बंद आहे. या जिल्ह्यातील 36 आगाराची वाहतूक पुर्णतः बंद असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, सध्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली जातेय. अशातच मराठा समाजालाकु कुणबी प्रमाणपत्र देण्यास नकार देणाऱ्या तरुणाला मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी चांगलाच चोप दिल्याची महिती समोर आली आहे.
प्रताप कांचन असं या तरुणाचं नाव आहे. त्याच्या अंगावर ऑईल ओतून त्याला उठाबश्या काढायला लावल्या. त्यानंतर त्याला माफी देखील मागायला सांगितली. प्रताप कांचन हा सुद्धा मराठा समाजाचा कार्यकर्ता आहे. पण काही दिवसांपूर्वी मुंबईत पत्रकार परिषद घेत त्याने कुणबी आणि मराठा वेगळे असल्याचा दावा केला होता. त्यामुळे मराठा क्रांती मार्चाने त्याला चोप दिला.
दरम्यान, मंत्री तानाजी सावंत यांच्या सांगण्यावरून प्रताप कांचन याने कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध केल्याचा आरोप या आंदोलकांनी केलाय.
दरम्यान मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यातबाबत सरकारने देखील पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. सोमवार (30 ऑक्टोबर) रोजी आरक्षण उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, शिंदे समितीने एक प्रथम अहवाल सादर केला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारून पुढची प्रक्रिया आम्ही करणार आहोत. समितीने 1 कोटी 72 लक्ष नोंदी या समितीने तपासल्या आहेत. त्यात 11 हजार 530 नोंदी मिळाल्या आहेत. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना दाखले देणार आहोत. याबाबत तहसीलदारांची बैठक घेऊन उद्यापासूनच दाखले द्यायला सुरू करणार आहोत.