मराठीतच पाट्या हव्यात, दिल्लीतून आले ‘सर्वोच्च’ आदेश

मुंबई : पुढील दोन महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने व्यापाऱ्यांना दिले आहेत. मराठी पाट्यांच्या सक्तीबाबत व्यापाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, आता कोर्टाने व्यापाऱ्यांना दोन महिन्यात मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत.

मविआ सरकारच्या काळात दुकानांवर मराठी पाट्या लावणे बंधनकारक करण्यात आले होते. परंतू, काही व्यावसायिकांनी याबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सोमवारी याप्रकरणी सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती बीवी नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने व्यापाऱ्यांना फटकारत मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत.

तसेच दसरा, दिवाळी जवळ आल्याने मराठी पाट्यांमुळे दुकानदारांनाच फायदा होईल असेही न्यायालयाने म्हटले आहे. यावेळी याचिकाकर्त्यांकडून अ‌ॅड. मोहिनी प्रिया यांनी कोर्टात बाजू मांडली. त्या म्हणाल्या की, दुकानदार मराठी पाट्या लावण्याच्या विरोधात नाहीत. परंतु राज्य सरकारने मराठी पाट्या बंधनकारक केल्या आहेत. त्यात अक्षरांचा फॉन्ट एकसारखाच असला पाहिजे. इतर भाषेच्या वरती मराठी भाषेचा उल्लेख असावा, असेही नियम आहेत. त्यामुळे सध्या असणाऱ्या पाट्या बदलण्यासाठी मोठा खर्च होईल, असा युक्तीवाद न्यायालयात करण्यात आला.

यावर सर्वोच्च न्यायालयाने व्यापाऱ्यांना तुम्ही मराठी पाट्या का लावू शकत नाही? असा सवाल केला. कर्नाटकातही हा नियम आहे. त्यामुळे तुम्ही नियम पाळायलाच हवेत, असे न्यायालयाने म्हटले. तुम्ही महाराष्ट्रात आहात. तुम्हाला मराठी पाट्यांचा फायदा माहित नाही का? न्यायालयीन लढाईवर खर्च करण्याऐवजी साध्या मराठी पाट्यांवर पैसे खर्च करावेत, असेही न्यायालयाने यावेळी म्हटले.