मुंबई : दुकानांवरील मराठी पाट्यांच्या मुद्यावरून मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. जर दुकानावर मराठी पाट्या लावल्या नाहीत तर, खळखट्याक करण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे. तसेच सोलापूर, दहिसर आणि ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांनी कारवाईही सुरु केली आहे.
मराठी पाट्या लावण्यासाठी दिलेली २५ नोव्हेंबरची मुदत संपली आहे. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी रविवारी सकाळी दहिसर आणि ठाण्यात खळ्ळखट्ट्याक आंदोलन केले. यावेळी त्यांनी दुकानांवरील इंग्रजी पाट्यांना काळं फासलं. याशिवाय मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. त्यामुळे या परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुरुवातीपासूनच मराठी पाट्यांसाठी आग्रही आहे. याशिवाय कोर्टानेही मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही या आदेशाचे पालन होताना दिसत नसल्याने मनसेने आक्रमक भुमिका घेतली आहे. रविवारी सकाळीच ठाण्यात मनसेकडून एमजी मोटर्स शोरुमला काळे फासण्यात आले. याशिवाय काही दुकानांवरील इंग्रजी पाट्यांची तोडफोडही करण्यात आली.