मलावीचे उपराष्ट्रपती सॉलोस चिलिमा यांचे विमान अपघातात मृत्यू, देशभर शोककळा

नवी दिल्ली : पूर्व आफ्रिकेतील मालवी देशाचे उपराष्ट्रपती सॉलोस क्लॉस चिलिमा यांना घेऊन जाणारे विमान बेपत्ता झाल्याची माहिती मलावीच्या अध्यक्षांनी सोमवारी दिली होती. त्यांनतर मंगळवारी दिवसभर चाललेल्या शोध मोहिमेनंतर उत्तरेकडील डोंगराळ प्रदेशात हे अपघाती विमान आढळले असू,  या अपघातात उपराष्ट्रपती सॉलोस चिलिमा यांच्यासह नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

चिलिमा मलावी संरक्षण दलाच्या विमानातून प्रवास करत होते. राजधानी लिलोंगवे येथून म्झुझूकडे स्थानिक वेळेनुसार सकाळी ९.१७ वाजता (भारतीय वेळेनुसार १२.४५ वाजता) विमानाने उड्डाण केले होते.

हवाई वाहतूक नियंत्रकांनी खराब हवामान आणि खराब दृश्यमानतेमुळे विमानाला म्झुझूच्या विमानतळावर लँडिंगचा प्रयत्न करू नये असे सांगितले. तसेच ते पुन्हा लिलोंगवेला वळण्यास सांगितले. त्यानंतर एअर ट्रॅफिक कंट्रोलचा विमानाशी संपर्क तुटला आणि ते रडारवरून गायब झाले होते.

दरम्यान, मंगळवारी दिवसभर चाललेल्या शोध मोहिमेनंतर उत्तरेकडील डोंगराळ प्रदेशात अपघाती विमान आढळून आले असून, या अपघतात उपराष्ट्रपती सॉलोस चिलिमा यांच्यासह नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने देशभरात शोककळा पसरली आहे.