पुणे : राज ठाकरे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठवाड्यात दंगा भडकावण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलनाचा वापर करत असल्याचा आरोप केला होता. आता शरद पवार यांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट केलीय. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर देखील पलटवार केला.
मराठा आंदोलक रमेश केरे पाटील यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षणावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना शरद पवार यांनी राज ठाकरेंवरही भाष्य केले. राज ठाकरे यांनी दोन-तीन वेळा माझं नाव का घेतलं हे मला कळालं नाही. मी या रस्त्याने कधी जात नाही. मला महाराष्ट्र ओळखतो. त्यामुळे मला काही प्रयत्न करायची गरज नाही अन् मी करतही नाही. हातभार लावायचा प्रश्न नाही. मी आता बोललो हे हातभार लावायचं लक्षण आहे की सुधारवण्याचं लक्षण आहे, असे शरद पवार म्हणाले.
राज ठाकरे यांनी कारण नसताना माझं नाव घेतलं. मी स्वत: सुद्धा मराठवाड्यात फिरतो. मलाही लोकांनी अडवलं निवेदन दिलं. आता हेही मीच ठरवतो का ?, असे शरद पवार म्हणाले. शरद पवारांनी म्हटले की, “राज ठाकरे यांच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. मी महाराष्ट्रात नेहमीच सकारात्मक बदलांसाठी प्रयत्नशील असतो आणि महाराष्ट्रातील जनतेला माझी भूमिका चांगलीच कळते.”