तरुण भारत लाईव्ह । १ सप्टेंबर २०२३। मंत्रालय बॉम्बने उडवून देऊ असा फोन पोलिसांना गुरुवारी दुपारी आल्याने एकच खळबळ उडाली होती. फोन करणारा व्यक्ती हा स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा असून परीक्षेसंबंधी सूचना करण्यासाठी त्याला मुख्यमंत्र्यांशी बोलायचे होते. मात्र संपर्क करून दिला जात नसल्याने त्याने असे कृत्य केल्याचे समोर आले.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, बाळकृष्ण बाळासाहेब ढाकणे असे याचे नाव असून गुरुवारी पोलिसांच्या ११२ या हेल्पलाईन क्रमांकावर फोन आला फोन करणाऱ्याने मला मुख्यमंत्र्यांशी बोलू द्या नाहीतर मंत्रालय बॉम्बने उडवून देईल अशी धमकी त्याने दिली. यावेळी फोनवर त्याने आपले नाव सांगितले नाही. तात्काळ हि माहिती मुंबई पोलिसांना तसेच मंत्रालय सुरक्षा विभागाला कळविण्यात आली.
हा फोन नगर जिल्ह्यातून आल्याने फोन करणाऱ्या व्यक्तीला शोधण्याची जबाबदारी हि नगर पोलिसांकडे सोपवली गेली. यानंतर पोलिसांनी लगेच हसनापूर गाठून फोन करणाऱ्या बाळकृष्ण बाळासाहेब ढाकणे याला ताब्यात घेतले असून चौकशीत हे समोर आले कि स्पर्धा परीक्षा ह्या पारदर्शक व्हायला हव्या अशी मागणी त्याला मुख्यमंत्र्यांकडे करायची होती पण मुख्यमंत्र्यांशी बोलू दिले जात नसल्याने हा प्रकार केल्याने त्याने पोलिसांना सांगितले.