मुंबई : राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अजित पवारांनी शरद पवारांकडे मागणी केली आहे. मला विरोधी पक्षनेते पदावरून मुक्त करा. असं म्हटलं आहे. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना कार्याध्यक्ष म्हणून घोषित केल्यानंतर अजित पवारांनी आपली खदखद स्पष्टपणे बोलून दाखवली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत अजित दादांनी आपल्याला संघटनेत पद देण्याची मागणी केली आहे.
‘संघटनेत आपल्याला कुठलेही पद दिले तरी आपल्याला हरकत नाही. तरी हा निर्णय पक्ष नेतृत्वाचा आहे,’ या शब्दांत अजित पवारांनी शरद पवारांसमोर एकप्रकारे कार्याध्यक्ष निवडीवरून आपली नाराजी बोलून दाखवली आहे. मुंबईत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम सुरु असून त्या कार्यक्रमात अजित दादा बोलत होते.
पुढे ते म्हणाले, “आपण आनंदाचा दिवस साजरा करत असताना चिंतन करायला हवं. आपण भकरी फिरवायची ठरवली आहे तर ती फिरलीच पाहिजे. २५ वर्ष माझ्या मनाला दुःख आहे. ममता बॅनर्जी एकट्याच्या जीवावर पश्चिम बंगाल घेऊ शकतात, केजरीवाल दोन राज्य आणतात, बीआरएस एकट्याच्या बळावर सत्ता आणते मग या सर्वांत तर पवार साहेब उजवे नेते आहेत ना? आपल्याला आत्मचिंतन, आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. आपण कुठे कमी पडलो याचा विचार केला पाहिजे.