जळगाव । राज्यात सध्या वातावरणात बदल पाहायला मिळत असून एकीकडे काही ठिकाणी उन्हाचा चटका कायम आहे तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळताना दिसत आहे. यातच हवामान खात्यानं राज्यातील काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. तर काही भागात उष्णतेच्या लाटेला इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात देखील अवकाळी पावसाच्या सरी बरसणार असल्याचा अंदाज आहे. यामुळे उकाड्यापासून जळगावकरांना दिलासा मिळू शकतो.
या जिल्ह्यांना यलो अलर्ट
जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. या भागात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहनही केलं आहे.
जळगाव, नाशिकमध्येही अवकाळी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, सातारा, नाशिक, जळगावमध्ये पावसाच्या रिमझिम सरी पाहायला मिळतील.
दरम्यान, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (50-60 किमी प्रतितास वेग) व मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.