जळगाव/पुणे । राज्यात पुन्हा एकदा ऐन थंडीत अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. पुढील ७२ तासांत दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, तसेच विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे.
या जिल्ह्यांना इशारा
दुसरीकडे धुळे, नंदुरबार येथेही रविवारपर्यंत हलक्या पावसाची शक्यता आहे. जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी, शनिवारी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकेल, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाने दिली. यासोबतच सातारा, सांगली, सोलापूर, बीड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपूर येथे शुक्रवारी तुरळक पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.
दरम्यान, गुरुवारी रात्री राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक पडलेल्या या पावसामुळे हवेत गारवा वाढला असून शेतकऱ्यांची मात्र चिंता वाढली आहे. या पावसामुळे पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यात देखील आगामी दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.