मुंबई: महाराष्ट्रासह लोकसभेच्या आतापर्यंत चार टप्प्यात निवडणुका झाल्या आहेत. पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडत आहे. यानंतर राजकीय वर्तुळाला साहजिकच 4 जूनच्या निकालाचे वेध लागली. मात्र, त्यापूर्वी भाजपचे नेत्याने महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होण्याचे संकेत दिले असून त्यांच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी 4 जून रोजी लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आणखी एक फूट पडणार असल्याचा दावा केला आहे. दोन्ही पक्षांमधून आमदार, नेते आणि कार्यकर्ते राजीनामा देऊन बाहेर पडतील. हे सर्वजण सध्या इतर पक्षांच्या संपर्कात आहेत, असा दावा मोहित कंबोज यांनी केला आहे.
त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर खरोखरच ठाकरे गट आणि शरद पवार गटातील उर्वरित आमदार उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची साथ सोडून सत्ताधारी गटात सामील होणार का, हे आगामी काळात स्पष्ट होईल. आता मोहित कंबोज यांच्या या दाव्यानंतर शरद पवार गट आणि ठाकरे गट काय प्रतिक्रिया देणार, याकडेही सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.