महाराष्ट्रात उभारले पहिले एसी बसस्थानक, जाणून घ्या कोणत्या शहरात ?

नाशिक : शहरात राज्यातील पहिले एसी बस्थानक उभारण्यात आले आहे. या स्थानकावरुन लांब पल्ल्याच्या गाड्या सुटणार असून, यामुळे ठक्कर बाजार बसस्थानकावरील भार कमी होणार आहे. कुंभमेळ्याच्या पार्शवभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी या स्थानकाची निर्मिती करण्यात आली. हे स्थानक पूर्णपणे एसी असून यात पोलिस चौकी, मॅनेजर केबीन, रेस्ट रूम, गेस्ट रूम यांचा समावेश आहे.

ठक्कर बसस्थानकालगत 1.73 हेक्टर जागेमध्ये वसलेल्या या बस स्थानकात 6033.22 चौरस मीटर इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. नागरिकांना प्रवेशासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार असणाऱ्या या बस स्थानकात तळघरात प्रशस्त पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या बस स्थानकात 20 फलाट असून यापैकी 4 फलाट वातानुकूलित करण्यात आलेले आहे.

नाशिकमध्ये होणारे या बसस्थानकात चालक व वाहक महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र विश्रामगृह तयार करण्यात आले आहे. मातांना आपल्या लहान बाळाची काळजी घेता यावी, यासाठी स्वतंत्र हिरकणी कक्ष तयार करण्यात आला आहे.

एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र विश्रामगृह देखील तयार करण्यात आले आहे. या बस स्थानकात अपंगांना प्रवेश करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेले असून, अपंगांसाठी स्वतंत्र प्रसाधाण गृह देखील तयार करण्यात आले आहे. बस स्थानकाच्या संपूर्ण परिसराचे ट्रिमिक्स काँक्रीटीकरण करण्यात आलेले आहे.