महाराष्ट्रात काँग्रेसला सर्वात मोठा धक्का.. बड्या नेत्याचा राजीनामा

मुंबई : आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीआधीच काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला आहे. मुंबईतील बड्या नेत्याने काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून याबाबतची माहिती ट्विट करत दिली आहे. दरम्यान, मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिल्यानंतर लवकरच ते दुसऱ्या पक्षात प्रवेश करतील, अशी माहिती आहे.

देवरा यांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय?

आज माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वाच्या अध्यायाचा समारोप करत आहे. काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा मी राजीनामा दिला आहे. माझ्या कुटुंबाचं काँग्रेस पक्षाशी असलेलं ५५ वर्षांचं नातं आज संपुष्टात येतंय. माझे सर्व वरिष्ठ नेते, सहकारी आणि कार्यकर्ते यांचे आभार मानतो. त्यांनी वर्षानुवर्षे देवरा कुटुंबाला साथ दिली, त्यामुळे त्यांचे आभार आहे, असं देवरा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मिलिंद देवरा यांनी ट्विट करत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. ते लवकरच शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबई या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी मिलिंद देवरा इच्छुक आहेत. मात्र महाविकास आघाडीतील सध्याची स्थिती पाहता ही जागा ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिलिंद देवरा यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आता ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. आजच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा शिवसेनेत प्रवेश होण्याची शक्यता आहे.

मिलिंद देवरा कोण आहेत?

मिलिंद देवरा हे काँग्रेसचे मुंबईतील बडे नेते आहेत. दिवंगत काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा यांचे पुत्र आहेत. त्यांनी 2004 आणि 2009 ची लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकले. डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात देवरा हे राज्यमंत्री होते. 2014 आणि 2019 मात्र मिलिंद देवरा यांचा पराभव झाला. ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी मिलिंद देवरा यांना पराभूत केलं. आता मिलिंद देवरा काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे