मुंबई । एकीकडे देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अशातच काँग्रेस पक्षाला लागलेली गळती काही केल्या थांबताना दिसत नाहीय. दरम्यान, ऐन निवडणूकीच्या तोंडावर कॉंग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. कॉँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला आहे.
अनेक बडे नेते काँग्रेसची साथ सोडत आहेत. अशातच आज गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. राजू वाघमारे शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. प्रवेश करताच त्यांना मोठी जबाबदारी देण्यात आलीय.
शिंदे गटामध्ये राजू वाघमारे यांना मुख्य सहप्रवक्ते अणि उपनेते पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाची सध्या होत असलेली फरफट आणि पक्षातील काही नेत्यांच्या राजकारणाला कंटाळून त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे. दीर्घकाळापासून राजू वाघमारे काँग्रेसचे प्रवक्ते होते. त्यांनी माध्यमांसमोर पक्षाची भूमिका अनेकदा परखडपणे जाहीर केली होती. अशातच आता वाघमारेंनी काँग्रेसची साथ सोडली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.