जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या जागांची संख्या 90 झाली आहे. आता जम्मूमध्ये 43 आणि काश्मीरमध्ये 47 जागा असतील. PoK साठी फक्त 24 जागा राखीव आहेत. येथे निवडणूक होऊ शकत नाही. तर लडाखमध्ये विधानसभा नाही. अशा प्रकारे एकूण 114 जागा असून त्यापैकी 90 जागांवर निवडणूक होणार आहे. जम्मू प्रदेशात सांबा, कठुआ, राजौरी, किश्तवाड, डोडा आणि उधमपूरमध्ये प्रत्येकी एक जागा वाढवण्यात आली आहे. त्याचवेळी काश्मीर भागातील कुपवाडा जिल्ह्यात एक जागा वाढवण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. ४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. १८ सप्टेंबरला पहिल्या टप्प्यातील मतदान, २५ सप्टेंबरला दुसऱ्या तर तिसऱ्या टप्प्यातील मतदान १ ऑक्टोबरला होणार आहे.
हरियाणात दोन कोटींहून अधिक मतदार आहेत. 90 पैकी 73 जागा सर्वसाधारण आहेत. हरियाणात 27 ऑगस्ट रोजी मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. हरियाणात 20 हजार 269 मतदान केंद्रे आहेत. हरियाणामध्ये १ ऑक्टोबरला मतदान होणार असून ४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
महाराष्ट्राचं काय ?
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका जाहीर झाल्या आहेत, त्यामुळे महाराष्ट्रात निवडणुका घेण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी आपल्याला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. सणासुदीला सुरुवात होणार आहे. पितृ पक्ष, नवरात्री आणि नंतर दिवाळी हे सणही येत आहेत, असे ते म्हणाले. तर महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबरला संपणार आहे.