महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा ; कोणत्या जिल्ह्यांत कोसळणार पाऊस? वाचा

जळगाव । राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट चालून आलं असून हवामान विभागाने 16 ते 19 मार्च दरम्यान विदर्भातील बहुतांश भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली आहे. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील, असं भारतीय हवामान खात्याने सांगितलं आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभे राहणार असून शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पीके काढून घ्यावी असा सल्ला देखील देण्यात आलाय.

सध्या वायव्य राजस्थानमध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव जाणवत असल्यामुळे उत्तरेतील राज्यात मुसळधार पावसासह गारपीट होत आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावर देखील होणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे. हवामान विभागाने पुन्हा विदर्भाला विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. येत्या १६ मार्चपासून ते १८ मार्चपर्यंत विदर्भातील अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांना पावसाचा इशारादेण्यात आलाय. खान्देशातही अवकाळी पावसाची शक्यता आहे.

दुसरीकडे, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहणार आहे. तर मुंबईसह पुणे शहरातील तापमानात एक ते दोन डिग्रीने घट होणार असून पुढील काही दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्यावर एकीकडे पावसाची शक्यता असतांना दुसरीकडे काही जिल्ह्यातील तापमानात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई, पुणे सोलापूर, मालेगाव, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० डिग्री सेल्सिअसच्या जवळ गेलाय. त्यामुळे नागरिकांना उन्हाच्या झळा बसत आहेत.