महाराष्ट्रात राजकीय महाभूकंप, अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार मागील काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. आज सकाळपासून अजित पवारांच्या देवगीरी बंगल्यावर अजित पवार समर्थक आमदारांची बैठक सुरू होती. या बैठकीनंतर अजित पवार राजभवनावर दाखल झाले आहेत. आता अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपास ३० आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान त्यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली.

राष्ट्रवादीच्या ५४ पैकी ३० आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नऊ आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. राजभवनात शपथविधीची तयारी करण्यात आली असून छगन भुजबळ, हसन मुश्रीफ असे शरद पवारांचे विश्वासू समजले जाणारे साथीदारही यावेळी अजित पवारांच्या मागे असल्याचे दिसून येत आहेत.

दरम्यान, अजित पवार यांची सकाळपासून आपल्या समर्थक आमदारांसोबत बैठक सुरू होती. यामध्ये दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किरण लहमाटे, निलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दौलत दरोडा, मकरंद पाटील, अतुल बेणके, सुनिल टिंगरे, अमोल मिटकरी, आदिती तटकरे, शेखर निकम, निलय नाईक, अशोक पवार, अनिल पाटील, सरोज अहिरे हे आमदार अजित पवार यांच्या बैठकीला उपस्थित होते, अशी माहिती आहे.