महाराष्ट्रात सातत्याने दंगली का उसळतात? फडणवीस म्हणाले…

अकोला : अकोला शहरातील हरिहरपेठ भागात शनिवारी मध्यरात्री दोन गटांमध्ये मोठी दंगल उसळली. अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. तसेच दंगलखोरांनी काही दुचाकी आणि चारचाकीही पेटवल्या. या घटनेत दोन्ही गटांमधील १० जणांसह दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले. या दंगली जाणीवपूर्वक घडवल्या जात असल्याचा आरोप राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. जे दंगली घडवण्याचा प्रयत्न करताहेत त्यांना अद्दल घडवणार, असा इशाराही फडणवीस यांनी दिला.

इन्स्टाग्रामवर एका व्यक्तीने वादग्रस्त पोस्ट शेअर केल्यामुळे आधी भांडण आणि मग दंगल उसळली असल्याचं सांगितलं जात आहे. या व्यक्तिविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अकोला शहरात मोठा पोलीसफाटा तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी पत्रकारांशी बोलतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले, दोन्ही ठिकाणी पूर्पणे शांतता आहे. पोलीस अलर्ट मोडवर होते, त्यामुळे कुठेही अनटोल्ड इंसिडन्स होऊ दिला नाही. जेव्हा लक्षात आलं की अशाप्रकारे काही लोक करण्याचं प्रयत्न करताहेत, सगळीकडची पोलीस कुमक त्याठिकाणी पोहोचली आणि आता पूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे.

महाराष्ट्रात सातत्याने दंगली का उसळताहेत असा प्रश्न फडणवीसांना विचारला असता, देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हे १०० टक्के जाणूनबुजून होतंय. कोणाची तरी फूस आहे. कोणीतरी महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करतंय. पण ते सफल होणार नाही. अशाप्रकारे जे करातेहत त्यांना आम्ही सोडणार नाहीत, असा सज्जड दमच फडणवीसांनी दिला आहे. काही संस्था, काही लोक मागून याला आग लावण्याचा, आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करताहेत आणि हे सगळं बाहेर आणेन, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.