महाराष्ट्र्र विधानसभेसाठी भाजपची रणनीती ठरली; या ४ नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपविणार

मुंबई । आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची रणनीती ठरल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वात यंदाची निवडणूक लढली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.मराठा, ओबीसी आणि आदिवासी समाजाला समोर ठेवून भाजप रणनिती आखत असून त्यासाठी फडणवीसांच्या नेतृत्वात पंकजा मुंडे, नारायण राणे आणि आशिष शेलार या नेत्यांवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्रातील पराभवानंतर भाजप आता पूर्ण ताकदीनिशी विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याचं दिसत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सह पंकजा मुंडे, नारायण राणे, आशिष शेलार यांच्यावर मुख्य जबाबदारी दिली जाणार असल्याचं कळतं आहे.

मराठा मतदार, ओबीसी मतदार आणि दलित आदिवासी मतदारांना भाजपकडे वळवण्याची रणनीती आहे. देवेंद्र फडणवसींच्या नेतृत्वात चारही नेते काम करणार आहेत. लवकरच चारही नेत्यांच्या यात्रा आणि सभा सुरू होणार आहेत. याच चेह-यांवर विधानसभेचा डाव खेळला जाणार असल्याची माहिती आहे.

तसंच जे. पी. नड्डा यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर भाजपचं राष्ट्रीय अध्यक्षतपद रिक्त होत आहे. या पदाची जबाबदारी कुणाकडे दिली जाणार? अशी चर्चा असतानाच याबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. 2025 च्या जानेवारी महिन्यात नवीन राष्ट्रीय अध्यक्ष पदभार घेणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्र विधानसभा निकालानंतर राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया सुरु होणार आहे. नवीन अध्यक्ष निवडीपर्यंत जे. पी. नड्डा अध्यक्ष राहणार आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक होईपर्यंत पक्षाध्यक्ष बदलाचे कुठलेही संकेत नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.