मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली. तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे लढायचं. सोबत मित्र पक्षांना घ्यायचं. तीन पक्षाच्या प्रत्येकी दोन दोन सदस्यांनी मिळून लोकसभेच्या जागा वाटप करायच्या आणि विधानसभेच्या जागा वाटपावर चर्चा करायची असं या बैठकीत ठरल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्वांचा उत्साह वाढला आहे. त्यामुळे पुढची लाईन ऑफ अॅक्शन महाविकास आघाडीची काय असावी? वज्रमूठ सभा काय कुठे कुठे घ्यावी यावर कालच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. मागच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची युती होती. यावेळी महाविकास आघाडी आहे. या तिघांनी लोकसभेच्या ४८ जागांचं वाटप करावं, कोणी कोणत्या जागा लढवायच्या ते ठरवावं. विधानसभेच्या २८८ जागांचीही चर्चा झाल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.
जागा वाटपासाठी प्रत्येक पक्षाकडून नावे येणार आहेत. पण जागा वाटपाची चर्चा करण्यासाठी एका पक्षाचे साधारण दोन सदस्य असावेत असं ठरलं. म्हणजे एकूण सहा नेते एकत्र बसून लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या २८८ जागांची चर्चा करतील. तीन पक्ष नाही तर त्यांच्याशी संबंधित जे मित्र पक्ष आहेत, त्यांची आमदार संख्या कमी असेल, पण त्यांना मानणारा वर्ग आहे. मतदार आहे. त्या पक्षांनाही सोबत घेण्याचा निर्णय घेतला, असं त्यांनी सांगितलं.