महाविकास आघाडीची पुढची रणनीती काय? जयंत पाटलांनी सांगितली आतली बातमी

मुंबई : महाविकास आघाडीची आगामी काळातील नेमकी रणनीती काय आहे, याबाबत जयंत पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिलीय. नुकतंच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली. या भेटीतील आतली बातमी जयंत पाटील यांनी दिलीय.

इंडिया आघाडी समन्वय समितीच्या बैठकीआधी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी गेले होते. यावेळी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली होती. याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी माहिती दिली आहे. “उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे दोन्ही नेते शरद पवार यांना भेटले. या बैठकीत वज्रमूठ सभांबद्दल चर्चा झाली. वज्रमूठ सभा पुन्हा सुरु होतील. या बैठकांचं आता नियोजन होणार आहे. काही सभा एकत्रित वज्रमूठ सभा होतील. तर काही राष्ट्रवादी म्हणून शरद पवार यांच्या वेगळ्या सभा होतील.” अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

“ठाण्याला आमच्या वज्रमूठची सभा होणार आहे, असा अंदाज आहे. तिथल्या स्थानिक नेत्यांशी चर्चा करुन सभा ठरवणार आहेत. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी स्थानिक नेत्यांशी बोलून निर्णय घेण्याचं ठरवलं आहे. निवडणूक आयोगासमोर आमची बाजू मांडू. आम्ही निवडणूक आयोगाला पक्षात फूट पडली नसल्याचं सांगितलं होतं. पण, आयोगानं आमची बाजू न ऐकता फूट असल्याचं जाहीर केलं आहे. याबाबत आम्ही वकीलांचा सल्ला घेत आहे. निवडणूक आयोग अयोग्य वागत आहे, असा त्याचा अर्थ दिसतो.”

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवर बोलताना जयंत पाटील म्हणाले, “सरकारी कर्मचाऱ्यांवर महत्वाच्या जबाबदाऱ्या असतात. तिथे कंत्राटी कर्मचारी नियुक्त करणं चुकीचं आहे. जबाबदारीची पदेही कंत्राटी पद्धतीनं भरली तर अतिशय गंभीर प्रश्न आहे. पैसे वाचवण्यासाठी बेभरवशाच्या लोकांना तात्पुरत्या सेवेत घेऊन काही कामे करून घेतली आणि त्यात चूका आढळल्या, तर त्याचा भुर्दंड जनतेला बसू शकतो. कंत्राटी कर्मचारी नियुक्तील मर्यादा असल्या पाहिजे. अन्यथा सरकारच कंत्राटी पद्धतीनं चालवायला लागेल.” असं ते म्हणाले.