जळगाव | जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आज मोठा ट्विस्ट पहायला मिळाला. महाविकास आघाडीत बंडखोरी झाल्याने काँग्रेस-शिवसेनेच्या मतांच्या जोरावर राष्ट्रवादीच्याच एका संचालकाने राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव केला. नाट्यमयी घडामोडींनंतर अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बंडखोर उमेदवार संजय पवार एक मतांनी विजयी झाले. तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अमोल चिमणराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे माजी आमदार गुलाबराव देवकर, उपाध्यक्ष श्यामकांत सोनवणे यांनी राजीनामा दिल्यानंतर अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता लागली होती. निवडणूक प्रक्रिया सुरु होण्याआधी अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांचे नाव निश्चित केल्याची माहिती आमदार अनिल पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली. मात्र, त्यानंतर अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे संजय पवार यांनी अर्ज दाखल केला. निवडणुकीनंतर संजय पवार यांना ११ तर रविंद्रभैय्या पाटील यांना १० मते पडली.
महाविकास आघाडीत बंडखोरी
पक्षाने माझी उमेदवारी निश्चित केली होती. त्यानुसार मी अर्ज केला केला होता. मात्र संजय पवार यांनी बंडखोरी केल्याने पक्षाचा पराभव झाला. पक्षश्रेष्टी त्यांच्यावर कारवाई करेल, अशी प्रतिक्रीया रविंद्र पाटील यांनी दिली. महाविकास आघाडीत बंडखोरी झाली. राष्ट्रवादीच्या ११ पैकी १० मते पक्षासोबत राहिली. एकाने बंडखोरी केली. त्यांना काँग्रेस व शिवसेनेने विश्वासघात केल्याने जिल्हा बँकेत महाविकास आघाडीचा घात झाला, अशी प्रतिक्रीया आमदार एकनाथ खडसे यांनी दिली.