मुंबई : महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल नसल्याचं अधून मधून अधोरेखीत होत असतं. कारण या-ना त्या कारणामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांची धुसफूस समोर येत असते. आताही विरोधीपक्ष नेते अजित पवार व ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात सातत्याने खटके उडत आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले व राष्ट्रवादीच्या नेत्यांचंही पटेनासं झालं आहे. याच मुद्यावर बोट ठेवत भाजपाने महाविकास आघाडी नव्हे, ही तर महाहताश आघाडी; असं म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे.
भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. महाविकास आघाडी नव्हे, ही तर आता महाहताश आघाडी! अजित पवार यांना विरोधी पक्षनेते पद नकोसे झाले आहे. नाना पटोले यांचे अध्यक्षपद पार्टीतच सर्वमान्य नाही आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे ना पक्ष, ना कार्यकर्ते, ना जनता आणि भाषा काय तर मा. मोदीजींना हरवण्याची! असं म्हणत उपाध्ये यांनी टोला लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं बुधवारी आयोजन मुंबईत करण्यात आलं होतं. या मेळाव्यामध्ये राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी उपस्थितांना संबोधित केलं. गेल्या काही दिवसांपासून पक्षात अस्वस्थ असल्याची चर्चा असलेल्या अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी मला विरोधी पक्षनेतेपद कधीच नको होतं. मला या जबादारीतून मुक्त करा आणि पक्ष संघटनेत जबाबदारी द्या, असं सांगत अजित पवार यांनी हा मेळावा गाजवला. यावरून भाजपाने आता जोरदार निशाणा साधला आहे.
महाविकास आघाडी नव्हे, ही तर आता महाहताश आघाडी !@AjitPawarSpeaks यांना विरोधी पक्षनेते पद नकोसे झाले आहे.@NANA_PATOLE यांचे अध्यक्षपद पार्टीतच सर्वमान्य नाही.
आणि@OfficeofUT यांच्याकडे ना पक्ष, ना कार्यकर्ते, ना जनता !
आणि भाषा काय तर मा. मोदीजींना हरवण्याची !
— Keshav Upadhye (@keshavupadhye) June 22, 2023