धरणगाव : शहरात गेल्या अनेक दिवसांपासून नळाला गढूळ पाणी येत आहे. परिणामी आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मातीमिश्रीत पिवळसर पाणी नागरिकांना नाईलाजाने प्राशन करावे लागत आहे. शिवाय अनेक भागात पाणी पोहचतच नाही. एन पावसाळ्यात शहरवासीयांना विकतचे पाणी घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी आज मातीमिश्रित, चिखलयुक्त पिवळसर गढूळ पाण्याच्या बॉटल सोबत घेत नगरपरिषदेवर मोर्चा काढत प्रशासनाच्या कारभाराबद्दल रोष व्यक्त केला. यावेळी मोर्चेकरांकडून ‘पाणी पिऊन दाखवा, लाखाचे बक्षीस मिळवा’ अशी ऑफर देण्यात आली.
धरणगाव शहरातील पाणीटंचाई प्रश्न कायम आहे. मुबलक पाणी उपलब्ध असताना देखील पाणीपुरवठ्याच्या योग्य नियोजनाअभावी नागरिकांना आठ ते दहा दिवसांत, वेळेवर पाणीपुरवठा होऊ शकत नाही. शहरातील विविध पक्षांकडून व नागरिकांनी वारंवार तक्रारी करुनही पाणीप्रश्न तडीस जात नसल्याने आज रोजी संतप्त नागरिकांनी एल्गार करीत धरणगाव नगरपरिषदेवर धडक दिली. महिला पुरुष तसेच आबालुद्ध नगरपालिकेवर धडकले. मोर्चा नगरपालिकेवर धडकल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करत, महिलांनी गढूळ पाण्याच्या बॉटल पाणी पुरवठा अभियंता व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दाखवीत हे पाणी आपण पिऊन दाखवा, लाखाचे बक्षीस देवू अशी ऑफर करीत जाब विचारला. शहराला सुरळीत पाणीपुरवठा केला पाहिजे अशी एक मुखी मागणी आक्रमक मोर्चेकरी महिला, पुरुष व आबालवृद्धांनी केली.
शहरात विविध विकास कामांचा धडाका सुरु असला तरी पाणी समस्या कायम आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात होणारा पाणी पुरवठा हा अत्यंत गढूळ, चिखलयुक्त पिवळसर होत आहे. याचा विपरित परिणाम शहरवासीयांच्या आरोग्यावर होत आहे. नागरिकांना पोटदुखी, काविळ, चक्कर येणे यासारखी आजारांचा सामना करावा लागतो.
शहरापासून अवघ्या ८ ते १० किमी अंतरावर जीवनवाहिनी तापीनदी, अंजनीनदी असतांना शहरवासीयांना पिण्याचे शुध्द पाणी मिळत नसल्याने अनेकांना अधिकचे पैसे मोजून पाणी विकत घ्यावे लागत आहे. घरकर, पाणीकर, वृक्षकर, कचराकर, शिक्षणकर यांसह विविध कर नियमित भरत असल्याने नागरिकांना वेळेवर स्वच्छ पाण्याची सुविधा नगरपरिषद प्रशासनाने पुरविणे गरजेचे आहे. यावेळी कार्यालयीन अधीक्षक भिकन पारधी सो, पाणी पुरवठा अभियंता सौ.अनुराधा चव्हाण, करनिरीक्षक प्रणव पाटील सो, यांनी मोर्चेकरांच्या समस्या जाणून घेत लवकरच निवारण करण्याचे आश्वासन दिले. पाणी पुरवठा अभियंता सौ.चव्हाण यांनी दूषित व गढूळ पाणी आलेल्या प्रभागात जाऊन चौकशी केली असता शहरात नवीन पाइपलाइनचे काम सुरू असल्याने तांत्रिक अडचणी आल्याचे सांगितले.