तरुण भारत लाईव्ह । २२ सप्टेंबर २०२३। महिला आरक्षण कायदा लागू झाल्यानंतर देशाचा चेहरामोहरा बदलेल. देश प्रगतीच्या एका नव्या उंचीवर पोहोचेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला. महिला आरक्षण विधेयक सर्व सहमतीने पारित झाल्याबद्दल लोकसभेत सर्व सदस्यांचे आभार मानताना केलेल्या निवेदनात मोदी यांनी म्हटले की लोकसभेत बुधवारी महिला आरक्षण विधेयक पारित झाले आज राज्यसभेतही हे विधेयक पारित होईल.
हे विधेयक पारित झाल्यामुळे देशातील मातृशक्ती नवी ऊर्जा संचारेल आत्मविश्वासाने ओतप्रोत मातृशक्ती देशाला प्रगतीच्या उंच शिखरावर घेऊन जाताना आपल्यातील अकल्पनीय अप्रतिम शक्तीचा परिचय करून देईल. हे पवित्र कार्य करण्यासाठी आपण सगळ्यांनी जे योगदान दिले विधेयकावर सार्थक चर्चा केली समर्थन दिले त्याबद्दल सभागृहाचा नेता म्हणून मी आपले अभिनंदन करतो. तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो.
बुधवारचा दिवस भारताच्या संसदीय इतिहासातील सोन्याचा दिवस होता. त्या सुवर्णक्षणाचे या सभागृहातील सर्व सदस्य सर्व पक्षाचे गटनेते साक्षीदार आणि भागीदार आहेत याचे श्रेय सभागृहाच्या आतच नाही तर बाहेरही या सभागृहातील सर्वांना आहे असे मोदी म्हणाले. सभागृहातील बोलण्याची संधी दिल्याबद्दल मोदी यांनी अध्यक्ष ओम बिर्ला यांचेही आभार मानले.
मोदी यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात चांद्रयान ३ च्या यशस्वीतेवर चर्चा सुरू झाली. महिला आरक्षण विधेयक बुधवारी लोकसभेत सर्व सहमतीने पारित झाले. आज राज्यसभेत विधेयकावरील चर्चा सुरू झाली. राज्यसभेचे विधेयक पारित झाल्यानंतर ते स्वाक्षरीसह राष्ट्रपतींकडे पाठवले जाऊ शकते. त्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर होईल.