नंदुरबार : महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या प्रत्येक गावातील आदिवासी विकासासाठी झटत असून विविध प्रकारच्या योजना लागू केलेल्या आहेत. शासनाच्या त्या योजनांचा प्रत्येक दुर्गम गावापर्यंत आम्ही लाभ पोहोचवत आहोत. आदिवासींना शंभर टक्के घरे देऊ. एक पण बाकी ठेवणार नाही. सर्व समाजातील बचत गटांना आणि लोकांनाही सहाय्य देऊ. आदिवासी बचत गटात प्रत्येकी 10 हजार सहाय्य देणार आहोत. मागाल ते देतो. बघू कोण थकतो. मार्च नंतर मागाल त्याला गाय, बकऱ्या, कोंबडी, गोठे सगळे देऊ; असे भरीव आश्वासन महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दिले.
नंदुरबार आणि तळोदा येथे आदिवासी विकास विभागाच्या वतीने शेळी गट निवड पत्र वितरणासाठी घेण्यात आलेल्या बचत गटाच्या महिला सदस्यांच्या पार पडलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. नंदुरबार येथील मेळाव्यात आदिवासी विकास विभागाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार अंतर्गत 16 गटांना शेळी गट निवड पत्र आणि एका कंपनी गटाला प्रक्रिया उद्योगासाठी एक कोटी रुपयांचा धनादेश आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित आणि खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते लाभार्थ्यांना सुपूर्द करण्यात आला. त्याचप्रमाणे तळोदा येथेही 31 बचत गटांना शेळी गट निवडपत्र आणि काही मत्स्य व्यवसाय संस्थांना आणि कंपनीला कोटी रुपयाचे धनादेश वितरित करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांनी आणि खासदार डॉक्टर हिना गावित यांनी प्रत्येक महिलेला स्वबळावर उभे करण्याचे आमचे ध्येय आहे असे सांगून उपस्थित महिलांना उज्वला गॅस जल जीवन मिशन हर घर जल योजना हर घर बिजली वगैरे योजनांचे महत्त्व समजावून सांगितले. लोणचे पापड शेवया अशा पारंपारिक खाद्यपदार्थांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन बनवले आणि विकले तर मोठा गृह उद्योग महिलांच्या आधार बनू शकतो त्याचबरोबर घरात साठवलेल्या कांद्याची पावडर बनवण्या सारख्या नव्या उद्योग व्यवसायांची उभारणी महिला करू शकतात आणि म्हणून मोदी सरकारने विविध योजना दिल्या आहेत त्याला आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आदिवासी विकास विभागाच्या निधीची जोड दिली आहे त्याचा लाभ आपल्या भागातील समस्त महिलांनी घ्यावा; असे आवाहन खासदार डॉक्टर हिना गावित यांनी केले.
आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित या प्रसंगी म्हणाले, आधार, रेशनकार्ड, पॅनकार्ड, सर्व आदिवासी विकास विभाग देतो. तुम्हाला कशाचाही खर्च नाही. हर घर बिजली योजनेतून वीज दिली. हर घर नल योजना दिली. काम दिले आता व्यवसाय सुद्धा देत आहे. 3000 महिलांना जवळजवळ सव्वा आठ कोटी रुपये दिले. सक्री, धडगाव, मोलगी, तोरणमाळ अशा काही ठिकाणी आम्ही बचत गटांना आमचूर भगर महू याच्या प्रक्रिया उद्योगासाठी प्रत्येकी कोटी रुपये दिलेदिले; अशी माहिती देऊन डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले की, महिलांना सध्या अर्धे प्रवास भाडे माफ आहे. आदिवासी विकास विभागाच्या वतीने मी सरकारला सांगेन की, आता यांना मोफत प्रवास द्या.
नंनंदुरबार येथील मेळाव्यात जिल्हा परिषद सदस्य अर्चना गावित, जयश्री गावित, आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार, सहाय्यक अधिकारी किरण मोरे, प्रशासकीय अधिकारी काकड, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील भास्करराव पाटील उपस्थित होते तर तळोदा येथील मेळाव्यात भाजपाचे तालुकाध्यक्ष रुपसिंग पाडवी, आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त डॉक्टर कांतीलाल टाटिया, आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त डॉक्टर शशिकांत वाणी, शिरपूर येथील सभापती पावरा, राहुल रंधे शेखर पाटील, आदिवासी विकास प्रकल्प तळोदा कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी मंदार पत्की, उमेद आणि माविमचे अधिकारी आदी उपस्थित होते.