माओवाद्यांचा मोठा कट उधळून लावला, 6 प्रेशर कुकर बॉम्ब; 9 IED जप्त

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या एक दिवस आधी गडचिरोलीत सुरक्षा दलांनी माओवाद्यांचा मोठा कट उधळून लावला. सहा प्रेशर कुकर बॉम्ब, मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि 9 आयईडी नष्ट केले.

निवडणुकीदरम्यान नक्षलवादी आयईडीने मोठा हल्ला करू शकतात, अशी माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतरही स्फोटके कुठे ठेवली होती, याचा पत्ता लागू शकला नाही. त्यामुळे 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत नक्षलवाद्यांचा कोणताही संभाव्य कट हाणून पाडण्यासाठी संपूर्ण परिसरात सुरक्षा दलांची मोठी तैनाती करण्यात आली होती. जेणेकरून स्फोटकांनी हल्ला करण्याचा माओवाद्यांचा डाव यशस्वी होऊ नये. दरम्यान, रविवारी टिपागड परिसरात स्फोटके लपवून ठेवलेल्या ठिकाणाचा शोध लागला.

एसपी नीलोत्पल यांनी सांगितले की, माहिती मिळाल्यानंतर स्फोटके शोधून नष्ट करण्यासाठी तातडीने एक टीम तयार करण्यात आली. यामध्ये बॉम्ब शोधक आणि निकामी पथक (BDDS) आणि CRPF च्या QAT सह C 60 ची एक तुकडी समाविष्ट होती. सोमवारी सकाळी पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना स्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर आणि डिटोनेटर्स, तीन क्लेमोर पाईप्स, श्रॉपनल आणि स्फोटके आढळून आली.