नवी दिल्ली : आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री, तेलगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आली आहे. पहाटे पहाटेच चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आळी आहे. टीडीपीनेच याबाबतची माहिती दिली आहे. भ्रष्टाचार प्रकरणी सीआयडीने ही कारवाई केली आहे. नायडू यांच्याविरोधात 2021मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यावर आज कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आंध्रप्रदेशात खळबळ उडाली आहे.
चंद्राबाबू नायडू आपल्या घरात होते. चंद्राबाबू नायडू गाढ झोपेत असतानाच सीआयडीची टीम धडकली. पहाटे 3 वाजता सीआयडीची टीमने आरके फंक्शन येथील कँम्पमधून चंद्राबाबूंना अटक केली. वायएसआर काँग्रेसचे नेते आणि मंत्र्यांनी चंद्राबाबू नायडू यांच्यावर आरोप केला होता. चंद्राबाबूंनी 118 कोटींची लाच घेतल्याचा आरोप केला होता. त्याशिवाय चंद्राबाबूंवर 350 कोटींच्या घोटाळ्याचा आरोपही आहे. हे सर्व प्रकरण पाहता आपल्याला अटक होईल असं चंद्राबाबू यांनी यापूर्वीच सांगितलं होतं. त्यानंतर आज त्यांना अटक झाली.
चंद्राबाबू नायडू यांचे चिरंजीव आणि टीडीपीचे नेते नारा लोकेश यांना पूर्व गोदावरी जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. टीडीपीच्या सोशल मीडियाने याबाबतची माहिती दिली आहे. लोकेश यांचा व्हिडीओही जारी करण्यात आला आहे. लोकेश चंद्राबाबू यांना भेटू शकत नाही, असं पोलिसांनी म्हटलं आहे. कौशल विकास घोटाळ्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. दरम्यान कौशल विकास घोटाळ्याची कोणत्याही पुराव्याशिवाय कोर्टात केस सुरू असताना चंद्राबाबू यांना अटक करण्याची गरज काय? असा सवाल या निमित्तान केला जात आहे.