‘माझी राखी, वीर सैनिकांसाठी’; सुरवाणी आश्रम शाळेच्या विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या स्वनिर्मित ‘राख्या’

सागर निकवाडे
धडगाव : वीर जवान आपल्या रक्षणासाठी रात्रंदिवस सीमेवर पहारा देतात. यामुळे आपण घरात सुरक्षितपणे विविध सण, समारंभ साजरे करू शकत आहोत. अशा सैनिक बांधवांप्रती आपली जाणीव ठेवून सुरवाणी आश्रम शाळेतील विद्यार्थिनींनी स्वतः राख्या तयार करून, त्या पोस्टाच्या माध्यमातून जवानांना पाठवल्या आहेत.

विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, देशाप्रती व आपल्या वीर सैनिकांप्रती आत्मीयता, बंधुभाव निर्माण व्हावा, कौशल्य गुणांचा विकास व्हावा यासाठी शाळेत (सुरवाणी आश्रम शाळा, ता. धडगाव जि. नंदुरबार) एक कौशल्यपूर्ण छोटासा उपक्रम घेण्यात आला. यात शाळेतील इ. ८, ९  व १ ० वी च्या विद्यार्थिनींनी आपल्या शिक्षकांचे मार्गदर्शन घेत, स्वतः उत्कृष्ट आणि आकर्षक अशा सुमारे ५०० राख्या तयात केल्या. शाळेचे अधीक्षक अमोल पवार यांनी आसाम सीमेवरील कॅप्टन अभिषेक सिंग, राजस्थान सीमेवरील लेफ्टनंट कर्नल क्रिष्णा सिंग यांच्याशी संपर्क करून, संपूर्ण राख्या आणि विद्यार्थिनींचे संदेशपत्र पोस्टाच्या माध्यमातून जवानांना पाठवले आहेत.

शाळेच्या अधीक्षिका दिपाली पाटील, अधीक्षक अमोल पवार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. कर्मचारी हितेश बांगड यांनी विद्यार्थिनींना राखी बनविण्याचे प्रशिक्षण दिले. मुख्याध्यापक गंगाराम परमार, मुख्याध्यापक नटवर तडवी यांचे विशेष सहकार्य लाभले. विद्यार्थिनींना सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची मदत व योग्य मार्गदर्शन लाभले.

भारतीय सीमेवर देशाच्या रक्षणासाठी तैनात असणारे सैनिकांना रक्षाबंधनाला घरी येऊ शकत नाही. त्यांचेही रक्षाबंधन व्हावं. यासाठी आम्ही विद्यार्थिनींना राख्या तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं. विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने स्वतः ५००  राख्या तयार केल्या. त्या आम्ही पोस्टाच्या माध्यमातून आसाम आणि राजस्थान सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना पाठवलया आहेत.
= अमोल पवार, अधीक्षक आश्रम शाळा सुरवाणी 

देशाच्या रक्षणासाठी घरापासून कोसो दूर असणाऱ्या सैनिक रक्षाबंधन कशा पद्धतीने साजरा करत असतील असा प्रश्न मनात उपस्थित झाला. आम्ही शिक्षकांना त्याबद्दल विचारलं. त्याबद्दल शिक्षकांनी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिलं. या आधारे आम्ही आमच्या हाताने राख्या बनवल्या आणि सीमेवर तैनात असलेल्या आमच्या मोठ्या भावांना त्या पोस्टाद्वारे पाठवल्या. या उपक्रमाचा आम्हाला खूप आनंद होत आहे. आम्ही तयार केलेल्या राख्या थेट सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांच्या हातावर बांधल्या जाणार आहेत.
= ललिता वळवी. विद्यार्थिनी आदिवासी आश्रम शाळा सुरवाणी