राज्य विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. दरम्यान, त्यांनी पत्रकार परिषद घेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले राज ठाकरे ?
माझं स्पष्ट म्हणणं आहे, की महाराष्ट्रासारख्या राज्याला आरक्षणाची गरज नाही. कारण, राज्यात मुबलक सुविधा आहेत. आपल्याला पुरून उरेल इतकं आहे. तरी आपल्याला गरज निर्माण होते कारण बाहेरच्या लोकांना ह्या सुविधा मिळत आहेत. म्हणून आपल्या लोकांना कमी पडत आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
आरक्षण आर्थिक निकषांवर द्यायला हवं असं माझं स्पष्ट मत आहे. पण, सध्या जातीच्या आधारावर राजकारण केलं जात आहे. सध्याच्या दौऱ्याचा मनोज जरांगे पाटील यांच्याशी काहीच संबंध नाही. पण, शरद पवार आणि उद्धव ठाकरे हा वाद निर्माण करत आहेत. या सर्वांमागे शरद पवार आणि उद्धव ठाकरे आहेत. यामागे काही पत्रकार देखील आहेत, असा दावा राज ठाकरे यांनी केला आहे.
माझ्या दौऱ्यावर अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न यांनी सुरू केला. पण उद्या माझं मोहोळ उठलं ना यांना निवडणुकीला एकही सभा घेता येणार नाही. त्यांनी माझ्या वाटेला जाऊ नये. मागे म्हटलं होतं यांच्याकडे प्रस्थापित आहेत. माझ्याकडे विस्थापित आहेत. माझ्या नादी लागू नका. तुम्हाला तुमचं राजकारण करायचं आहे. समाजात तेढ निर्माण करून विष कालवून यांना कोणतं राजकारण करायचं आहे. यांच्या राजकारणाचा बेसच हा आहे. यांना वाटतं आमचे एवढे खासदार आले. त्या खासदारांवर जाऊ नये. तुमचा राग देवेंद्र फडणवीस यांच्यावर असेल तर तुम्ही राजकारण करताना त्या पद्धतीने बोला. समाजात कशाला भांडण लावत आहात, असं राज ठाकरे म्हणाले.