Crime News : देशभरात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत चाललेय. अशातच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. संतापजनक म्हणजे, नराधमांनी पीडित अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला रस्त्यावर फेकले. यानंतर ही अल्पवयीन मुलगी अर्धनग्न आणि रक्तबंबाळ अवस्थेतच अनेकांकडे मदत मागते मात्र, तिच्या मदतीसाठी कोणीही पुढे येत नसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या चाैकशीसाठी एसपींनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे.
पीडित अल्पवयीन मुलगी उत्तर प्रदेशातील असण्याची शक्यता आहे. महाकाल पोलिस स्टेशन परिसरात ही मुलगी बेशुद्ध अवस्थेत सापडली. तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, एका आश्रमासमोर या १२ वर्षीय चिमुरडीवर अज्ञातांनी अत्याचार केल्याची घटना मंगळवारी (दि.२६) उघडकीस आली असल्याचे उज्जैनचे पोलिस अधीक्षक सचिन शर्मा यांनी स्पष्ट केले आहे.
या प्रकरणातील पीडितीने अत्याचार प्रकरणाबाबत कोणतीही माहिती दिली नाही, मात्र तिच्या वैद्यकीय अहवालात तिच्यावर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी महाकाल पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याचा संशय पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मुलीची प्रकृती गंभीर असल्याने तिला उपचारासाठी इंदूरला हलविण्यात आले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी तातडीने ‘एसआयटी’ स्थापन केली आहे.