तरुण भारत लाईव्ह । पुणे : मान्सून संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या वर्षी मान्सून वेळेत दाखल होणार असल्याचे संकेत आहेत. मान्सूनसाठी अनुकूल वातावरण असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यातच मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो, असा अंदाज स्कायमेटचे अध्यक्ष जीपी शर्मा यांनी वर्तविला आहे.
१९ मे रोजीच नैऋत्य मान्सूनने अंदमान समुद्राच्या दक्षिणेकडील भागात धडक दिली होती. मात्र, त्यात अजून प्रगती झालेली नाही. ‘हिंदी महासागराच्या वायव्येकडील क्रॉस विषुववृत्तीय प्रवाह किंवा प्रवाह मजबूत होऊ लागला आहे. पुढील दोन-तीन दिवसांत बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान-निकोबार बेटांवर मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे दिसते, असंही त्यांनी सांगितले.
दक्षिण अरबी समुद्रात मान्सून प्रस्थापित होण्यास सुमारे एक आठवडा लागेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. ४ जूनच्या आसपासच मान्सून केरळमध्ये पोहोचेल, असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हिंद महासागरातील मान्सून वार्यांचा परिणाम होत असल्याने केरळमध्ये मान्सूनचे आगमन होण्यास विलंब होऊ शकतो, असंही हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अंदाजानुसार जूनच्या सुरुवातीला वारे पुन्हा तयार होतील आणि ५ ते ७ जून दरम्यान मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकेल.