पुणे । राज्यात जून महिन्यात ओढ दिलेल्या पावसाने जुलै महिन्यात चांगली हजेरी लावली. मात्र ऑगस्ट महिन्यात दीर्घ सुटी पावसाने घेतली आहे. पावसाने दडी मारल्यामुळे नागरिकांची आणि शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाअभावी खरिपाचे पिके करपून चालली आहेत. त्यामुळे शेतकरी राजा पावसाची प्रतीक्षा करत आहे. दरम्यान, आता मान्सूनच्या परतीचा प्रवास निश्चित झाला आहे.
ऑगस्ट महिन्याच्या उर्वरित दिवसांमध्ये राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस बघायला मिळणार आहे. तसेच, सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देखील परिस्थिती तशीच राहणार आहे. मात्र, सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात सरासरी पेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. 8 सप्टेंबरपासून 21 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात सरासरी इतका किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस बघायला मिळू शकतो.
मान्सून परतणार कधी?
ऑगस्ट महिन्यात अपेक्षित पाऊस पडत नसल्यानं नागरिकांची आणि शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मान्सून परतीच्या वाटेवर असेल तर, शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी वाढ होणार का, असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे. मात्र, हवामान खात्याने परतीच्या पावसाबाबत कुठलाही अंदाज वर्तवलेला नाही.
“सध्याची परिस्थिती बघता परतीच्या पावसाबद्दल आम्ही कुठलाही अंदाज बांधलेला नाही. परतीच्या पावसाची सुरुवात ही सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होते. मात्र, सध्या तरी परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण नाही. सप्टेंबर महिन्यात येणारा पाऊस हा शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरू शकेल”, असं हवामान खात्याचे प्रमुख के.एस. होसळीकर यांनी सांगितलं आहे.