धुळे : गेल्या चार दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पाऊस सुरु आहे. धुळे जिल्ह्यातही संततधार पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे शहराच्या मधोमध वाहणाऱ्या पांजरा नदीला पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. या पुराच्या पाण्यात पोहता येतं का ? असं मित्रांनी विचारल्यावर तरुणाने थेट नदीत उडी घेतली. दरम्यान, त्याला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो वाहून गेला असून, बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. अमीन पिंजारी असे तरुणाचे नाव आहे.
पांझरा नदीजवळील स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या पुतळ्याजवळील परिसरात अमीन पिंजारी (३०) हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होता. दरम्यान, रविवार, २५ रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास त्याने तीन मित्रांसह पांझरा नदीत उडी मारली. यावेळी तिघे मित्र बाहेर आले. पण अमीन बाहेर आला नाही.
तो पोहून दुसऱ्या दिशेने जात असल्याचे अनेकांना वाटले. पण काही वेळातच अमीन पुराच्या पाण्यात गटांगळ्या खाताना दिसला. त्यामुळे लहान पूल व दोन्ही काठांवरून तरूण धावत निघाले. मोठ्या पुलावर गर्दी झाली. घटना कळाल्यानंतर पोलिस आले. सायंकाळी पांझरेची पाणी पातळी वाढली. तसेच अंधार पडल्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आले.
यापूर्वी ७ ऑगस्ट रोजी अमीन नजिरोद्दीन लोहार नामक तरुणाने मोठ्या पुलावरून पांझरेत उडी घेतली होती. अमीन लोहार बेपत्ता झालेल्या ठिकाणी रविवारी अमीन पिंजारी पाण्यात बेपत्ता झाला. बेपत्ता अमीन पिंजारी सेंट्रिंग काम करत होता. त्याला दोन लहान मुले आहे. रविवारी तो घरी होता. या वेळी त्याला इतर तिघांनी पोहता येते का असे बोलून चिडवल्यामुळे त्याने पांझरेत उडी घेतली, अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शी यांनी दिली आहे.