मिशन २०२४ : महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये काँग्रेस भाकरी फिरवणार!

नवी दिल्ली : आगामी २०२४ च्या निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसनं तयारीला सुरुवात केली आहे. त्यात प्रामुख्याने पक्ष संघटनात्मक फेरबदलावर काँग्रेसनं जोर दिला आहे. यात राजस्थान, महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये लवकरच नवीन चेहर्‍याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. काँग्रेसमधील पक्षातंर्गत फेरबदलाची प्रक्रिया येत्या १ ते ३ आठवड्यात पूर्ण होईल. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे संबंधित पदाधिकार्‍यांची यादी पोहचली आहे.

सूत्रांनुसार, महाराष्ट्र आणि तामिळनाडूचे प्रभारी बदलले जातील. ओडिशा, हरियाणा आणि बिहारमध्ये नवीन काँग्रेस प्रभारी नियुक्त केले जातील. त्याचसोबत महाराष्ट्र आणि तामिळनाडूचे प्रभारी बदलले जातील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे राजस्थानमध्ये काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होतील. कारण याठिकाणी अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद सातत्याने चव्हाट्यावर येत आहेत.

हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकात प्रियंका गांधी यांनी निवडणुकीच्या प्रचाराचे नेतृत्व केले होते. दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसला विजय मिळाला. त्यामुळे प्रियंका गांधी यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. याआधी प्रियंका गांधींना उत्तर प्रदेशचे प्रभारी बनवले होते. आता प्रियंका गांधी अन्य राज्यांवर लक्ष केंद्रीत करू शकतात.