मी आहे ना, काळजी करू नका!

Prime Minister Narendra Modi : लोकसभेत विरोधी पक्षांनी मांडलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू असताना संसद भवन परिसरात पार पडलेल्या भाजपा संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मी आहे ना, काळजी करू नका’ असा संदेश देत पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना एकप्रकारे 2024 च्या निवडणुकीत काय चित्र राहील, याचा उलगडा करून टाकला आहे. तसे तर विविध राजकीय पक्ष; मग ते मित्र पक्षातील असो की विरोधकांमधील; सार्‍यांना पुढचे पंतप्रधान मोदीच राहतील, याचा अंदाज एकंदर राजकीय परिस्थिती पाहता येऊ लागला आहे. काही नेत्यांनी तसे जाहीरपणे बोलूनही दाखविले आहे. पण मोदींनी या बैठकीत काळजी करू नका, मी आहे, असे जे वक्तव्य केले आहे, हे त्यांच्यातील आत्मविश्वास दर्शविणारे आहे. (Prime Minister Modi) मोदींविरुद्ध अविश्वास ठराव आणून विरोधकांनी आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. अनेक वृत्त वाहिन्यांनी केलेल्या सर्वेक्षणांमध्येही नरेंद्र मोदीच इतरांच्या तुलनेत मतदारांच्या पसंतीचे पंंतप्रधान ठरले आहेत. मोदींनी देशाची प्रतिमा जागतिक पातळीवर इतकी उंचावली की, इतर देशांचे नेते मोदींसोबत फोटो काढायला, त्यांच्या शेजारी बसायला, छायाचित्रात त्यांच्या शेजारी उभे राहायला आणि त्यांनी केलेल्या सूचना सहर्ष उचलून धरायला उत्सुक असल्याचे दिसून आले आहे.

मोदींच्या नुकत्याच झालेल्या अमेरिका दौर्‍यात अमेरिकन खासदारांनी ज्याप्रमाणे प्रोटोकॉल बाजूला सारून त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याची, त्यांचे हस्ताक्षर मिळविण्याची उत्स्फूर्तता दाखविली, त्यावरून त्यांच्या विदेशातील लोकप्रियतेचीही प्रचीती आली. मोदी म्हणजे अजब रसायन आहे. ते लहानांसोबत लहान होऊन जातात आणि युवकांशी चर्चा करताना त्यांच्यातील उत्साह ओसंडून वाहू लागतो. (Prime Minister Modi) दांडग्या अनुभवामुळे, अफाट वाचनामुळे, सर्वदूर प्रवासामुळे आणि साधनेतील सातत्यामुळे समाजातील प्रत्येक वर्गाची नस पकडण्यात त्यांना मुळीच वेळ लागत नाही. कुठल्याही विषयावर बोलताना त्यांना अडचण येत नाही. म्हणूनच उद्योजकांशी बोलताना त्यांना त्यांच्यातील एक व्यक्ती बोलत असल्याचा अनुभव येतो आणि ‘चाय पे चर्चा’ करताना नागरिकांना त्यांच्यापर्यंत आपल्या समस्या कशा पोहोचल्या, याचे आश्चर्य वाटते. देशाच्या सर्व भागात मोदींच्या नावाला पसंती आहे. त्यांच्या सभा-संमेलनांचा नूर पाहून उगाच नाही विरोधक गर्भगळित होत. आजवरचा अनुभव असा आहे की, त्यांच्या एका सभेचा परिणाम आजूबाजूच्या 10-15 मतदारसंघांवर पडतो. दूरदूरून लोक त्यांचे भाषण ऐकायला येतात आणि त्यांचे विचारकण घेऊन परततात.

सध्या विरोधी पक्षांनाही 2024 च्या निवडणुकीचा ज्वर चढायला लागला आहे. संसदेतील भाषणांमधून त्याचा उलगडा झालाच. विरोधी पक्षाची जी मोट ‘इंडिया’ या नावांतर्गत बांधली गेली आहे, त्या आघाडीचे सर्वपक्षीय नेते मोदींना महागाईवरून झोडपताना दिसत आहेत. पण मुळात महागाईचा मुद्दा देशात कोणीच चर्चेला घेताना दिसत नाही. सामान्य माणूस तर सोयी-सुविधा मिळत असल्याने खूश आहे. टोमॅटोच्या वाढलेल्या किमतीचा मुद्दा विरोधकांनी रेटून बघितला, पण त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मुळात कांदे म्हणा, टोमॅटो म्हणा अथवा डाळी, तेल आदींच्या मूल्यवृद्धीचा संबंध सरकारशीच असतो, असे नाही. अनेकदा त्या त्या राज्यांमध्ये झालेल्या (Prime Minister Modi) पीक-पाण्याच्या परिस्थितीवरही या किमती अवलंबून असतात. कुठल्या राज्यातील पिके अतिवृ÷ष्टीच्या तडाख्यात सापडल्यास, आपोआपच त्या पिकांच्या पुरवठ्यावर परिणाम होऊन किमती आकाशाला भिडतात. मालाची ही पूर्तता इतर ठिकाणांहून होतपर्यंत सामान्य जनता भरडली जाते, हे निश्चित. पण अशी परिस्थिती सर्वच वस्तूंबाबत किंवा धान्यांबाबत राहू शकत नाही, राहात नाही. त्यामुळे थोड्याशा भाववाढीचा मुद्दा किती ताणायचा, हे देखील विरोधकांनी ध्यानात घ्यायला हवे. गेल्या काही वर्षांत केंद्र सरकार जबाबदेही झाले आहे, एवढे मात्र निश्चित.

अनेकदा आपण याचा अनुभव घेतला आहे. विशेषतः रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवाशांनी त्यांच्यावर गुदरलेला एखादा प्रसंग लिहून तो मंत्र्यांना अथवा रेल्वेच्या अधिकार्‍यांना टॅग केला तर त्या समस्येची त्वरेने दखल घेतली गेल्याचे आपण अनेकदा ऐकले आहे. विदेशांमध्ये राजकीय संकट आल्यानंतर किंवा तेथील भारतीयांची स्थिती अस्थिर झाल्यानंतर, त्यांच्या जान-मालाला धोका निर्माण झाल्यावर भारत सरकारने तत्परतेने धावपळ करून, भारतीयांना विमानांद्वारे परत आणण्याची तत्परता दाखविली आहे. यालाच जबाबदारीचे वहन करणे असे म्हणतात. लोकही याचा अनुभव घेत आहेत. (Prime Minister Modi) कुणी सांगते व्हिसाचे पूर्वीचे नियम आणि आताचे यात सकारात्मक बदल झाले आहेत. त्यातील किचकट अटी नाहीशा करण्यात आल्या आहेत. कुणाला मोदींनी कोविड काळात विविध देशांना केलेल्या औषधांच्या मदतीचा मानवतावादी दृष्टिकोन आवडून गेला आहे. डिजिटलायझेशनचा विस्तार ही मोदी सरकारचीच उपलब्धी आहे. डिजिटलायझेशनमुळे सर्वसामान्यांची इतकी सोय झाली आहे की, खिशात पैसे बाळगण्याची गरजच उरलेली नाही. अगदी चहाटपरीवाले, पोहेवाले, भुट्टेवाले, भाजीवाले, छोटे दुकानदारदेखील ऑनलाईन पेमेंटचा जास्तीत जास्त वापर करताना दिसत आहेत. डिजिटल ट्रॉन्झॅक्शनमध्ये भारताचाच वाटा 40 टक्के असल्याची जागतिक नोंद झालेली आहे.

2014 ची निवडणूक (Prime Minister Modi) मोदींनी जिंकली त्यावेळी त्यांच्यामागे गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कार्याची जोड होती. त्यांनी तीन टर्म गुजरातचे मुख्यमंत्रिपद भूषविले आणि या राज्याला प्रगतीच्या शिखरावर नेण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेतली. गुजरातमधील अनेक शहरे स्मार्ट सिटी म्हणून विकसित करून दाखविली, जी इतर राज्यांसाठी प्रेरणादायी ठरली. त्यावेळी विविध क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा अनुभव घेण्यासाठी लोक गुजरातेत जात, हे आपल्याला माहिती आहे. आता तर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. दिल्लीच्या राजकारणात आता मोदी चांगलेच रुळले आहेत. त्यांना पत्रकारांचीही नस सापडली आहे. नरेंद्र मोदी पत्रकारांना सामोरे जात नाहीत, अशी ओरड अनेक पत्रकार करताना दिसतात. पण त्यांनी खुशामतखोर पत्रकारांना एका बाजूला ठेवण्यातही यश मिळविले आहे. प्रसंगी ते पत्रकारांशीही बोलतात, पण आपल्या स्वतःच्या शर्तीवर त्यांची ती चर्चा असते. कुणाला मुलाखती द्यायच्या, कुणाला नाही, हे ठरविणारी आपली स्वतःची यंत्रणा त्यांनी विकसित केली आहे.

26 मे 2023 रोजी (Prime Minister Modi) मोदींनी पंतप्रधान म्हणून 9 वर्षे पूर्ण केली. साहजिकच, पंतप्रधान मोदी जनसामान्यांपुढे कोणती मूल्ये आणू शकले, हे समजून घेणे बोधप्रद ठरावे. किमान पाच महत्त्वाचे घटक असे आहेत जे पंतप्रधान मोदींना इतरांपेक्षा वेगळे ठरवतात. ते घटक आहेत त्यांचे तत्त्वज्ञान, नेतृत्व, शासन पद्धती, पथदर्शी निर्णय आणि कार्यशैली; सरतेशेवटी भारतीय संस्कृतीची सर्वात लक्षणीय सामायिकता त्यांच्या योजनांमध्ये आहे. 2014 च्या प्रचार मोहिमेत त्यांना ‘सब का साथ, सब का विकास’ या मंत्राची साथ मिळाली. त्यानंतर 2019 हे वर्ष सुरू झाले आणि त्यांनी मूळ मंत्राला ‘सब का विश्वास’ची जोड दिली आणि अलीकडे ‘सब का प्रयास’ हा मंत्र त्यासोबत जोडला. एक भारत, श्रेष्ठ भारत, मेक इन इंडिया, आयुष्मान भारत योजना, जन-धन योजना, उज्ज्वला गॅस योजना, पंतप्रधान आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, हर घर शौचालय, हर घर नल या त्यांच्या योजनांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. काहीही करायचे ते अगदी भव्य-दिव्य ही (Prime Minister Modi) मोदींची काम करण्याची शैली आहे. त्यांच्या याच योजनांना मिळालेल्या यशामुळे त्यांचा पुढच्या निवडणुकीतील विजयाचा विश्वास दुणावला आहे. त्यामुळे दिल्ली विधेयकावरून विरोधकांचा झालेला पराभव ही लोकसभेची सेमिफायनल नव्हे तर 2024 च्या विजयाची ग्वाही देणारा प्रसंग होता, हे ध्यानात घेतले जायला हवे.