मी चढण चढायला सुरुवात केली, एका स्टेजला जाऊन मलाही; मुख्यमंत्र्यांनी थरारक अनुभव सर्वांसमोर मांडला

मुंबई : रायगडच्या इर्शाळवाडी दुर्घटनेत आत्तापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. तर  १०० पेक्षा जास्त नागरिक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे हे  काल सकाळी ७ वाजता इर्शाळवाडीत पोहोचले होते. त्यानंतर अनेक तास त्यांनी तिथेच थांबून सर्व प्रशासकीय यंत्रणा कामाला लावल्या होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत निवेदन दिले. यावेळी त्यांनी घटनास्थळावरचा थरारक आणि मन हेलावून टाकणारा आपला अनुभव सर्वांसमोर मांडला.

इर्शाळवाडी हे गाव किती दुर्गम ठिकाणी आणि तिकडे जाण्याचा रस्ता किती कठीण होता, हे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. याठिकाणी सर्वप्रथम पोहोचणाऱ्या गिरीश महाजन आणि आमदार महेश बालदी यांचे खरं तर कौतुक केले पाहिजे. इर्शाळवाडी गाव प्रचंड उंचीवर होते. गावाकडे जाणारा रस्ता चढताना एका पॉईंटला मलाही या गोष्टीची जाणीव झाली होती. मी पहाटे इर्शाळवाडी गावाच्या पायथ्याशी पोहोचलो. रात्रभर मी गिरीश महाजन यांच्या संपर्कात होतो. आपण गेल्यामुळे यंत्रणा हलते, अलर्ट होते. पण इर्शाळवाडी गावाकडे जाणारा रस्ता चढणीचा आहे. तिकडे जाण्याची इच्छा असल्यामुळे मी चढण चढायला सुरुवात केली. पण एका स्टेजला जाऊन मलाही हे गाव किती उंचीवर आहे आणि रस्ता किती चढणीचा आहे, याची जाणीव झाली. याठिकाणची परिस्थिती एकूणच भयानक होती. मी रस्ता चढताना विचार केला की, जी लोकं वरती साहित्य घेऊन जात आहेत, त्यांना सलामच केला पाहिजे. कारण हा रस्ता चढणे अत्यंत कठीण होते. तिथल्या मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश न बघावण्यासारखा होता. हा अत्यंत दुर्दैवी प्रसंग होता. आपल्याकडे सर्व यंत्रणा असूनही त्या वापरु शकलो नाही, याची खंत वाटते. पण आपण वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे, असे एकनाथ शिंदे यांनी आपल्या निवेदनात म्हटले.

इर्शाळवाडी गावावर दरड कोसळली तेव्हा आश्रमशाळेतील काही विद्यार्थी खेळत होते. त्यांना आवाज आला आणि ते त्याठिकाणी पळाले. यानंतर त्यांनी बाकी लोकांना कळवले. गावातील काही लोक मासेमारीसाठी, काही लोक भात शेतीसाठी बाहेर गेले होते. आणखी काही लोक बाहेर असण्याची शक्यता आहे. आतापर्यंत २० मृतदेह हाती लागले आहेत. मी मृतांच्या नातेवाईकांना भेटलो. त्यांचा आक्रोश सुरु होता, सगळी परिस्थिती खूप अडचणीची होती. मातीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढलेल्या मृतदेहांची विल्हेवाट लावणे जिकिरीचे काम होते. एकीकडे एनडीआरएफचे जवान ढिगारा उपसण्याचे काम करत होते. दुसऱ्या बाजुला मृतांच्या नातेवाईकांशी बोलून अंत्यविधी करायचा ठरला. त्यासाठी काही लोक वरतीच खड्डे खणत होते. हे दृश्य अत्यंत विदारक होते, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.