मी तसे म्हणालोच नाही, संजय राऊतांनी उच्च न्यायालयात पलटी मारत यू-टर्न घेतला

नवी दिल्ली : शिवसेनेचे नाव अन् चिन्ह मिळवण्यासाठी २ हजार कोटींचा सौदा झाल्याच्या आपल्या विधानावरून खासदार संजय राऊत यांनी पलटी मारत यू-टर्न घेतला आहे. सत्ताधार्‍यांकडून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. एवढेच नाही तर उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांविरोधात कट रचला जात आहे, असे त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या आपल्या प्रत्युत्तरात म्हणालेत.
संजय राऊत यांनी गत फेब्रुवारी महिन्यात शिवसेनेचे नाव व धनुष्यबाण चिन्ह मिळवण्यासाठी २ हजार कोटींचा खर्च केला गेल्याचा खळबळजनक दावा केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर शिवसेनेचे (शिंदे गट) लोकसभेतील नेते राहुल शेवाळे यांनी त्यांच्याविरोधात मानहाणीचा दिवाणी दावा दाखल केला होता. त्यात त्यांनी उद्धव ठाकरे गटाचे नेते आपल्या पक्षाविरोधात भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर गत २८ मार्च रोजी उच्च न्यायालयाने या प्रकरणी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह संजय राऊत यांना नोटीस बजावली होती.

मी तसे म्हणालोच नाही
 
संजय राऊत यांनी या नोटीसीला दिलेल्या उत्तरात संविधानातील कलम १९ (१) (अ) चा दाखला देत आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उल्लेख केला आहे. ते म्हणाले – शिंदे गटाने सत्तेच्या लोभापायी कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक मोबदल्यात घटनाबाह्य कृती केल्याचा आपला विश्वास आहे. मी निवडणूक आयोगाला २ हजार कोटी रुपये दिल्याचे कोणतेही विधान केले नाही. राजकीय पक्ष ही एक निर्जीव संघटना आहे. त्यामुळे ती बदनामीच्या खटल्याचा विषय होऊच शकत नाही.मानहाणी, व्यक्तीच्या प्रतिष्ठेशी संबंधित विषय आहे. शिवसेनेची बदनामी करण्यासाठी हा खटला चुकीच्या हेतूने दाखल करण्यात आला आहे, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊत यांनी केलेले विधान
संजय राऊत यांनी वरील आरोपांविषयी एक ट्विट केले होते. त्यात ते म्हणाले होते की, माझ्याकडे खात्रीलायक माहिती आहे. चिन्ह व नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत २ हजार कोटींचा सौदा व व्यवहार झाला आहे. हा प्राथमिक आकडा असून, तो १०० टक्के सत्य आहे. बर्‍याच गोष्टी लवकरच उघड होतील. देशाच्या इतिहासात असे केव्हाच घडले नाही.