मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठा विजय नोंदवला आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबाबत राज्यात मंथन सुरू आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मोठे वक्तव्य केले आहे. मी मुख्यमंत्रिपदाचा दावेदार नव्हतो आणि नाही असे त्यांनी म्हटले आहे. सीएम शिवराज म्हणाले की, मी कार्यकर्ता आहे. या संदर्भात भाजप मला जे काही काम देईल ते काम मी प्रामाणिकपणे करेन.
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने 230 पैकी 163 जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेस केवळ 66 जागांवर मर्यादित राहिली. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री शिवराज म्हणाले, “मोदीजी आमचे नेते आहेत. त्यांच्यासोबत काम करणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मी भाजपचा कार्यकर्ता आहे. जनतेचा मी मनापासून आभारी आहे. मी शक्य तितके काम केले.”
या निवडणुकीत भाजपच्या विजयाचे हिरो म्हणून सीएम शिवराज समोर आले आहेत. 64 वर्षीय शिवराज यांनी पुन्हा एकदा राज्यातील सत्ताविरोधी लाटेवर मात करत शानदार विजयाची नोंद केली आहे. भाजपच्या या विजयामागे सर्वाधिक चर्चेत असलेली योजना म्हणजे गेम चेंजर मानली जाणारी ‘लाडली बेहन’. मात्र, निवडणुकीपूर्वी पक्षाने त्यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून सादर केले नाही.
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शिवराज सिंह चौहान यांनी सर्वाधिक काळ म्हणजे 16 वर्षे 9 महिने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवून इतिहास रचला आहे. ते चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री झाले असून आता ते पुन्हा एकदा राज्याची कमान सांभाळू शकतात. मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारांच्या यादीत शिवराज यांचे नाव आघाडीवर आहे.